छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पुण्यावरून भाडे घेऊन आल्यानंतर थकल्याने बाबा पेट्रोलपंप उड्डाणपुलाखाली कार उभी करून कारमध्ये चालक झोपी गेला. मात्र ४ मुलांनी येऊन कारमध्ये चोरी करत १२ हजार रुपयांचा मोबाइल आणि १० हजार रुपये रोख असलेले पाकीट गायब केले. चालकाच्या मित्राने वेळीच धाव घेऊन एका मुलाला पकडले, पण ३ मुले पाकीट, मोबाइल घेऊन पळून गेली. वेदांतनगर पोलिसांनी चारही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गणेश हिरालाल बारवाल (वय ३०, रा. मोरे चौक, गरुड झेप अकॅडमीसमोर, पंढरपूर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यावसाय करतात. आज, ५ जुलैला पहाटे साडेबाराच्या सुमारास (मध्यरात्री) पुण्यावरून भाडे घेऊन छत्रपती संभाजीनगरला आले. बाबा पेट्रोलपंप चौकात प्रवाशांना सोडले. गाडी चालवून थकल्यामुळे तिथेच उड्डाणपुलाखाली कार (MH 20 GV 9188) उभी करून झोपी गेले. पहाटे अडीचला त्यांचा मित्र शुभम पाटील यांनी गणेश यांना झोपीतून उठवले व सांगितले की, तुझ्या गाडीतून चोरी झाली असून एका मुलाला मी पकडले आहे.
तीन मुले पळून गेली आहेत. गाडीत चार्जिंगला लावलेला मोबाईल व मोबाईलजवळ ठेवलेले पाकीट, त्यात १० हजार रुपये होते, चोरीला गेले होते. पकडलेल्या मुलाला विचारले असता त्याने सांगितले की, सोबतच्या ३ मुलांनी चोरून पळाले आहेत. शुभम पाटीलने पोलिसांना ११२ हेल्पलाइनवर कॉल करून घटनेची माहिती दिली. त्या ठिकाणी पोलीस आले. त्या अल्पवयीन मुलाला नाव विचारले असता त्याने नाव सांगून (मुलगा १४ वर्षांचा अल्पवयीन असल्याने नाव प्रसिद्ध केलेले नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.) तो वदळगाव जिल्हा परिषद शाळेमागे किरायाने राहत असल्याचे सांगितले. १२ हजार रुपयांचा मोबाइल आणि १० हजार रुपये रोख असलेले पाकीट मुलांनी चोरून नेल्याची तक्रार वेदांतनगर पोलीस ठाण्यात केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सुपे करत आहेत.