छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : माहेरावरून १ लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी २९ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून घरातून हाकलून देण्यात आल्याची घटना पडेगावमध्ये समोर आली आहे. सध्या माहेरी राहत असलेल्या विवाहितेने सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुरुवारी (३ जुलै) गुन्हा दाखल केला आहे.
सना उस्मान शेख (वय २९, रा. अन्सार कॉलनी, गल्ली नं. २, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर, हल्ली मुक्काम बजाज हॉस्पीटलमागे सुधाकरनगर, छत्रपती संभाजीनगर) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी तिचे लग्न उस्मान रहीम शेख (वय २६, रा. अन्सार कॉलनी) याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर ती सासरी नांदण्यास गेली असता पती व सासरच्या लोकांनी ५ ते ६ महिने चांगली वागणूक दिली. त्यानंतर पती क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करून हाताचापटाने, लाथाबुक्याने मारहाण करून तिच्याशी अबोला धरू लागला.
सासरचे लोक शिवीगाळ करायचे. परिस्थिती सुधारेल या आशेवर ती पतीसोबत जून २०२४ पर्यंत राहत होती. मात्र पतीच्या वागण्यात बदल होत नसल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून आईकडे सुधाकरनगर येथे राहू लागली. त्यानंतर नांदवण्यासाठी पती व सासरच्यांनी तुझ्या आई- वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी केली. आई- वडिलांची परिस्थिती हालाखीची असल्याने तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर ती पतीकडे दोनवेळेस नांदण्यासाठी गेली, मात्र पतीने चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करून घरातून हाकलून दिले, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार नारायण भागवत करत आहेत.