छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ग्रामपंचायतीची परवानगी न घेता वैजापूर तालुक्यातील जातेगावमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवल्याने विरगाव पोलिसांनी ५ जणांविरुद्ध मंगळवारी (१ जुलै) गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरुद्ध जातेगाव ग्रामपंचायतीचे अधिकारी सरदार सुखदेव काळे (वय ३७, रा. साई पार्क, गंगापूर रोड वैजापूर) यांनी तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, २८ जूनला काळे हे घरी असताना पोलीस पाटील रामदास बत्तीसे यांनी फोन करून कळवले, की जातेगावमध्ये ग्रामपंचायतीच्या जागेवर दलीत वस्तीतील समाज मंदिरासमोर सिमेंटच्या चबुतऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा अज्ञात लोकांनी बसविलेला आहे. ही माहिती मिळताच काळे हे तातडीने जातेगावला आले. ग्रामपंचायतीच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा कोणीतरी बसविलेला दिसला. त्यानंतर काळे यांनी गावात चौकशी केली असता गावातील तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद मुकींदा सातुरे यांच्याकडून समजले की, भावराव जयवंता दुशींग, विनायक फकीरा सातुरे, अशोक काशिनाथ सातुरे, भगवान मुकिंदा सातुरे, पंढरीनाथ जगन्नाथ सातुरे (सर्व रा. जातेगाव) यांनी पुतळा बसविला आहे.
यावेळी गावातील सरपंच दिनकर राजाराम दुशींग, उपसरपंच रोहिदास ढवळे हेही पाहणीवेळी हजर होते. विनापरवाना शासनाची परवानगी न घेता पुतळा बसवला गेला आणि ऊन, वारा, पावसापासून संरक्षणाची कोणतीही काळजीही घेतलेली नव्हती. यामुळे पुतळ्याची विटंबना होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काळे यांनी विरगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी भावराव जयवंता दुशींग, विनायक फकीरा सातुरे, अशोक काशिनाथ सातुरे, भगवान मुकिंदा सातुरे, पंढरीनाथ जगन्नाथ सातुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विजय ब्राह्मंदे करत आहेत.