छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाची निवडणूक शुक्रवारी (४ जुलै) होऊन अध्यक्षपदी ॲड. योगिता थोरात-क्षीरसागर विजयी झाल्या. त्यांना ६३७ मते मिळाली असून, ४ प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या एकूण मतांपेक्षा १०० मते जास्त मिळाली आहेत. निकटच्या प्रतिस्पर्धी ॲड. निमा सूर्यवंशी यांना १७१ मते मिळाली.
अध्यक्षपदाच्या शर्यतीतील ॲड. रेणुका घुले-पालवे यांना १६६, ॲड. आशा राख यांना १६०, ॲड. आशा रसाळ यांना १४० मते मिळाली. कोरोनामुळे एक वर्ष निवडणूक झाली नव्हती. त्यानंतर तिसऱ्यांदा महिला उमेदवाराला संधी मिळाली आहे. एकूण १५३८ मतदार होते, पैकी १३४० मतदारांनी मतदान केले.
सचिवपदी ॲड. श्रीकृष्ण चौधरी यांची निवड झाली असून, त्यांना ६६६ मते मिळाली. उपाध्यक्षपदी ॲड. संदिपान मोरमपल्ले आणि पूनम बोडखे-पाटील बिनविरोध निवडून आले. सहसचिवपदी ॲड. निसर्गराज गर्जे आणि ॲड. रंजिता बारहाते निवडून आले. त्यांना अनुक्रमे ८०६ आणि ७८७ मते मिळाली.
कोषाध्यक्षपदी ॲड. विनायक सोळंके निवडून आले. त्यांना ७४१ मते मिळाली. ग्रंथालय चेअरमनपदी ॲड. पंडित आणेराव व ग्रंथालय सचिवपदी ॲड. नानासाहेब भागवत बिनविरोध निवडून आले. महिला सदस्यपदी ॲड. कृष्णाबाई भांडे आणि सुल्ताना रहीम खान या बिनविरोध निवडून आल्या. सदस्यपदी ॲड. चेतन चौधरी (१०७३ मते), ॲड. रवी गिते (९२६ मते), ॲड. सतीश काळे (८५० मते), ॲड. विजय काळे (९७३ मते), ॲड. विष्णू कांदे (९४८ मते), ॲड. ईश्वर नरोडे-पाटील (९४७ मते) आणि ॲड. शिवानंद टेकवाड (९०५ मते) विजयी झाले.
मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. प्रल्हाद बचाटे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. कमलाकर सूर्यवंशी, ॲड. ज्ञानेश्वर बागुल, ॲड. रश्मी कुलकर्णी, ॲड. मिथुन भास्कर, ॲड. धैर्यशील माने, ॲड. आर. डी. सानप, ॲड. विजय देशमुख, ॲड. ललित महाजन, ॲड. योगेश बोलकर, ॲड. पवन इप्पर, ॲड. विष्णू मदन पाटील, ॲड. अमेय सबनीस यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित अध्यक्षा ॲड. योगिता थोरात-क्षीरसागर म्हणाल्या, की सरकारी वकील म्हणून काम केलेले असल्याने ४६६ इतके मताधिक्य मिळाले. वाहनतळाची समस्या मोठी असून, त्यावर तोडगा काढण्यास प्राधान्य देणार आहे, असे त्या म्हणाल्या.