सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : साडेचार वर्षीय बालकाचा शेतातील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (४ जुलै) दुपारी रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथे घडली. कार्तिक भगवान मोरे (रा. रहिमाबाद) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
कार्तिकची आई कोमल मोरे या समाधान नवल यांच्या शेतात मिरची तोडण्यासाठी गेल्या होत्या. कार्तिकही आईसोबत शेतात गेला होता. आई मिरच्या तोडत असताना तो हौदाजवळ खेळत होता. खेळता-खेळता पाण्यात पडला. ही बाब लक्षात येताच त्याला सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सचिन काळे आणि सतीश पाटील करत आहेत. कार्तिकचे वडील भगवान मोरे सूरतला मजुरीसाठी गेले असून, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.