छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी (४ जुलै) पडेगाव रोडवर दिवसभरात २७२ अतिक्रमणांवर बुलडोझर चालवला. गुरुवारी ५८५ अतिक्रमणे काढली होती. आता रस्ता पूर्णपणे २०० फूट रुंद झाला असून, आज, उद्या (५ व ६ जुलै) कारवाईला ब्रेक देण्यात आला असून, या दोन दिवसांत जळगाव रोडवरील अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्यास संधी मिळाली आहे. सोमवारी (७ जुलै) जळगाव रोडकडे बुलडोझरची तोंडे फिरणार आहेत.

शनिवारी मोहरम, रविवारी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त लागणार असल्याने पोलिसांच्या सूचनेनुसार, महापालिकेने आज, उद्या कारवाई थांबवली. पडेगाव ते दौलताबाद टी पॉईंट हा राज्य महामार्ग आहे. महापालिकेच्या हद्दीत या रस्त्याची रुंदी विकास आराखड्यानुसार ६० मीटर आहे. सध्या हा रस्ता ३० मीटर रूंद असून, उर्वरित ३० मीटर अंतरात पडेगाव आणि मिटमिटा येथे अतिक्रमणे झाली होती. शुक्रवारी सकाळी मिटमिट्याच्या पुढे कारवाईला सुरुवात करण्यात आली. सायंकाळपर्यंत २७२ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी कारवाईची पाहणी केली. महापालिकेचे ३५०, पोलिसांचे २५० अधिकारी, कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते.
जळगाव रोडवरील अतिक्रमणधारक धास्तावले…
सोमवारी जळगाव रोडवरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. हा रस्ता ६० मीटर रूंद करण्यात येणार आहे. शुक्रवारी काळा गणपती मंदिरासमोर भीषण अपघात घडल्यानंतर महापालिकेने जळगाव रोड आता कारवाईसाठी निवडल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवार, रविवार त्यांना अतिक्रमणे काढून घेण्याची संधी मिळाली आहे.