छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मंत्री संजय शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करताना आंबेडकरी समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल असलेल्या माजी खासदार इम्तियाज जलील यांना चौकशीसाठी बोलवायला वरिष्ठ पोलीस अधिकारी शुक्रवारी (४ जुलै) रात्री गेले. मात्र चौकशीसाठीची नोटीस घेण्यास जलील यांनी नकार दिला. माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले असून, नोटीस स्वीकारणार नाही, अशी भूमिका जलील यांनी घेतली. पोलीस बंगल्यावर पोहोचल्याचे कळताच जलील यांचे शेकडो समर्थक बंगल्याबाहेर जमले होते.
जलील यांनी जमावाला शांत केले. नंतर पोलिसांशी १५ मिनिटे संवाद साधला. नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्याने पोलीस माघारी परतले. सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आठला सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे, सिटी चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी आणि बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप नोटीस घेऊन आले होते. जलील यांनी नोटीस न घेतल्यामुळे पुढील कारवाईबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत मंत्री संजय शिरसाट यांच्यावर जमीन घोटाळ्याचे आरोप करताना एमआयएम नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आंबेडकरी समाजाबद्दल आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला होता. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध क्रांती चौक, बेगमपुरा, उस्मानपुरा पोलीस ठाण्यांत ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र जलील यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अन्याय, अत्याचारविरोधी कृती समितीने शहरात जनआक्रोश मोर्चाही काढला होता. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात चौकशीला हजर राहण्याची नोटीस घेऊन पोलीस अधिकारी आले होते.
काही काळ तणाव…
जलील यांच्या बंगल्यावर पोलीस अधिकारी धडकल्याचे कळल्याने काही मिनिटांतच त्यांच्या बंगल्यासमोर मोठा जमाव जमला. शेकडो कार्यकर्ते, समर्थक जमले होते. त्यांना जलील यांनीच शांत केले आणि पोलिसांशी चर्चा केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पोलिसांना करायची असते. त्यासाठी ते आले होते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी समर्थकांना केले.