छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला, दुसरे लग्नही केले, तरीही पहिल्या बायकोबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकल्याने संतापलेल्या तिच्या नातेवाइकांनी थेट युवकाच्या घरी धडक दिली. या वेळी तो घरी सापडला नाही, पण त्याच्या दुसऱ्या पत्नीला शिवीगाळ आणि भावाला बेदम मार खावा लागला. युवकाचा भाऊ गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (२ जुलै) दुपारी पारूंडी (ता. पैठण) येथे घडली.
योगेश बबन काळे (वय २७, रा. पारूंडी ता. पैठण) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. योगेशला एक भाऊ असून, शंकर बबन काळे असे त्याचे नाव आहे. योगेश आणि शंकर या दोघांचेही लग्न झालेले आहे. ते वेगवेगळे राहतात. शंकरचे पहिले लग्न कासारवाडी (ता. अंबड) येथील कृष्णा विनायक खरात याची मुलगी भारतीसोबत २०१३ मध्ये झाले होते. मात्र दोघांत वाद होऊन घटस्फोट झाला होता. नंतर शंकरने दुसरे लग्न केले. बुधवारी (२ जुलै) दुपारी तीनला योगेश शेतात काम करत असताना शंकरची दुसरी पत्नी मुक्ताने कॉल केला व सांगितले, की कृष्णा विनायक खरात, प्रदीप कृष्णा खरात, केदार कृष्णा खरात, ब्रह्मदेव रमेश काळे, अनिल गिरे (सर्व रा. नारायणगाव, कासारवाडी, ता. अंबड जि. जालना) हे घरी आले आहेत.
तुझा नवरा शंकर काळे कोठे आहे असे म्हणून ते शिवीगाळ करत आहेत. तुम्ही घरी लवकर या… त्यामुळे योगेश लगेचच गावात घरी आला. त्याने माझ्या भावजयीला शिवीगाळ का करता, असे त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, की तुझा भाऊ शंकर काळे याने भारतीला सोडचिठ्ठी दिलेली आहे. त्याचा काहीएक संबंध नसताना भारतीची तुझ्या भावाने इन्स्टाग्रामवर पोस्ट का केली? तुझा भाऊ कोठे आहे, असे त्यांनी योगेशलाही शिवीगाळ केली. कृष्णा खरातने दगडाने योगेशला मारहाण केली. प्रदीप खरातने त्याच्या हातातील दांड्याने डाव्या हातावर मारून योगेशला गंभीर दुखापत केली.
कृष्णा खरात याने दांड्याने उजव्या पायावर मारून मुक्का मार दिला. ब्रह्मदेव व अनिल गिरे यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. गावातील लोकांनी मदतीला धावून येत योगेशची सुटका केली. योगेशला पाचोड ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. पाचोड पोलिसांनी कृष्णा विनायक खरात, प्रदीप कृष्णा खरात, केदार कृष्णा खरात, ब्रह्मदेव रमेश काळे, अनिल गिरे सर्व (रा. कासारवाडी ता. अंबड जि. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार बाबुराव साबळे करत आहेत.