छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेजारच्या महिलेने डिश टीव्हीचा केबल १५ वर्षांच्या मुलीला ओढायला सांगितला. मुलीने तो ओढला असता मोठ्या वीज वाहिनीचा केबलला स्पर्श होऊन स्फोट झाला आणि मुलीचा शॉक लागून मृत्यू झाला. खुलताबाद पोलिसांनी तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी शेजारच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (३ जुलै) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
राणी सोमिनाथ घोरपडे (वय १५, रा. मोठी आळी, खुलताबाद) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. प्रियांका सोमिनाथ घोरपडे (वय १८, रा. मोठी आळी, खुलताबाद) या तरुणीने याप्रकरणात तक्रार दिली आहे. ती आई-वडिलांसोबत राहते. तिचे आई- वडील मजुरी काम करतात. ते सदाशिव पवार (रा. मोठी आळी, खुलताबाद) यांच्या घरी सहा वर्षांपासून किरायाने रूम घेऊन दुसऱ्या मजल्यावर राहतात. तिला एक मोठा भाऊ पवन असून लहान बहीण राणी होती. खुलताबादच्या मराठी माध्यमिक विद्यालयात नववीत शिकत होती. त्यांच्या बिल्डींगच्या बाजूला विकी सोनवणे व त्याची आई पुष्पाबाई सोनवणे राहतात.
गुरुवारी सकाळी सातला राणी शाळेत गेली. त्यानंतर त्यांचे आई-वडील सकाळी १० ला मूळ गावी चिकलठाण (ता. कन्नड) येथे शेतात पेरणी करण्यासाठी गेले होते. दुपारी साडे बाराला राणी शाळेतून घरी आली. सायंकाळी पाचला प्रियांका, राणी आणि त्यांच्या मामाचा लहान मुलगा आशिष (वय ३) किरायाच्या रूमसमोर छतावर बसलेले होते. गल्लीत राहणारा विकी ज्ञानेश्वर सोनवणे याच्या घराच्या वरच्या मजल्याचे काम मागील पाच ते सहा दिवसांपासून चालू आहे. विकीकडे काम करणारी ३ माणसे काम करत होते.
पुष्पाबाई ज्ञानेश्वर सोनवणे यांनी राणीला आवाज दिला व म्हणाल्या, की राणी तुमच्याकडे येणारा डिश टिव्हीचा केबल गल्लीमध्ये लटकत आहे. तो तू तुमच्याकडे ओढून घे. त्यामुळे राणीने लटकणारी केबल हातात धरून ओढला. त्याचवेळी गल्लीतून जाणाऱ्या मोठ्या वीज वाहिनीवर जोरात स्फोट होऊन राणीच्या हातातील डिश टिव्हीच्या केबलमध्ये करंट येऊन राणी जागेवरच पडली. राणीला गल्लीतील लोकांच्या मदतीने प्रियांकाने बाजूला ओढले. तेव्हा तिच्या हाताला, पायाला ईलेक्ट्रीक शॉकच्या जखमा दिसत होत्या. पुष्पाबाई ज्ञानेश्वर सोनवणे हिला माझी बहीण ही १५ वर्षांची आहे हे माहीत असतानासुध्दा तिने राणीला ईलेक्ट्रीक लाईट चालू असताना डिश टिव्हीचा केबल ओढण्यास सांगितले. तिच्यामुळेच राणीचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला, असे प्रियांकाने तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे करत आहेत.