छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : खुलताबाद तालुक्यातील चिंचोली येथील एक वारकरी कुटुंब घरासमोर राहणाऱ्या दारूड्याच्या त्रासाला कमालीचे त्रासले आहे. रोज सायंकाळ झाली की दारूडा दारू पिऊन येत वारकरी कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करतो. काही दिवसांपूर्वी त्याने या वारकरी कुटुंबावर हल्लाही केला होता. त्यावेळी पोलीस तक्रारही करण्यात आली. खुलताबाद पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता दारूडा अधिकच आक्रमक झाला असून, तो आता शिवीगाळ करताना पोलिसांचाही उद्धार करतो. त्यामुळे आता न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न वारकरी कुटुंबाला पडला आहे. हे कुटुंब प्रचंड धास्तावले असून, सामूहिकरित्या जिवाचे बरेवाईट करण्याची मानसिकता झाली आहे, असा उद्वेग वारकरी सांप्रदायातील चर्चित नाव असलेले कीर्तनकार गोपाल जैतमहाल यांनी व्यक्त केला आहे. वारकरी कुटुंबाला एका दारूड्याकडून त्रास होत असल्याची बाब समोर आल्यानंतर जिल्हाभर संताप पसरला असून, गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांनीच आता पुढे होऊन दारूड्याचा हा त्रास संपविण्याची भावना व्यक्त होत आहे. कारण दारूड्याच्या कृत्यामुळे चिंचोली गावाचेही नाव खराब होत आहे.
मधुकर फकीरराव बोडखे (रा. चिंचोली, ता. खुलताबाद) असे या दारूड्याचे नाव आहे. मंगळवारच्या (१ जुलै) घटनेनंतर खुलताबाद पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पुन्हा प्रतिबंधात्मक गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी २४ एप्रिलला सायंकाळी मधुकर बोडखे याने दारू पिऊन शिवीगाळ करताना हातात कोयता घेऊन जैतमहाल कुटुंबावर हल्ला केला होता. यात जैतमहाल यांच्यासह घरातील सर्वांनाच त्याने बेदम मारहाण केली होती. जीवे मारण्याची धमकी दिली होती. विशेष म्हणजे, जैतमहाल कुटुंबाचा गावात कुणाला त्रास नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. दारूडा बोडखे हा या कुटुंबाला इतका त्रास देण्याचे कारण अगदीच क्षुल्लक असून, काही वर्षांपूर्वी दारूड्याच्या चुलत भावाकडे कीर्तनकार जैतमहाल यांनी बालसंस्कार शिबीर घेतले होते. तेव्हापासून बोडखेला राग आहे. काही महिन्यांपूर्वी बोडखेने जैतमहाल यांची चिमुकली मुलगी मागितली होती. तो दारूच्या नशेत असल्याने त्याच्याकडे मुलगी देण्यास जैतमहाल यांच्या पत्नीने नकार दिला, त्यानंतर बोडखेचा संताप वाढत गेला आणि तो जैतमहाल कुटुंबाला शिवीगाळ करून त्रास देऊ लागला.
२४ एप्रिलला त्याने कुटुंबावर हल्ला केल्यानंतर खुलताबाद पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमुळे तो आणखीनच त्रासदायक बनल्याचे जैतमहाल यांनी सांगितले. आता शिवीगाळ करताना लाव पोलीस स्टेशनला फोन म्हणत, पोलिसांनाही घाबरत नसल्याचे सांगतो. वाढत्या त्रासामुळे तो कुटुंबीयांना नुकसान पोहोचवेल या धाकाने कीर्तनकार जैतमहाल यंदा पंढरपूरच्या वारीलाही जाऊ शकले नाहीत. मंगळवारी (१ जुलै) सायंकाळी सहाला बोडखेने शिवीगाळ सुरू केली तेव्हा जैतमहाल यांनी त्याला शिवीगाळ न करण्याविषयी सांगितले असता त्याने तू पोलीस ठाण्यात माझी तक्रार का केली, असे म्हणत अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मंगळवारी जैतमहाल हे पुन्हा खुलताबाद पोलीस ठाण्यात कुटुंबासह धावले. पोलीसही या दारूड्यापुढे हतबल झाल्याचे दिसून आले. त्यांनी प्रतिबंधात्मक गुन्हा दाखल करून त्याला आम्ही समजावू, असे सांगितले.
जैतमहाल कुटुंब धास्तावले…
पोलिसांनाही दारूडा घाबरत नसल्याने जैतमहाल कुटुंब धास्तावले असून, त्याच्या त्रासामुळे आम्ही जिवाचे बरेवाईट करण्याच्या मानसिकतेत आहोत, अशी भावना कीर्तनकार गोपाल जैतमहाल यांनी व्यक्त केली. त्याने जैतमहाल कुटुंबाला खोटी पोलीस तक्रार करून अडकविण्याचीही धमकी दिली आहे. एक दारूडा एवढा त्रास या कुटुंबाला देत असताना गावाचे कर्तेधर्ते म्हणून मिरवणारे नक्की कुठे आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत माहिती घेतली असता कळले, की त्याने यापूर्वी काही ग्रामस्थांविरुद्धही खोट्या पोलीस तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे गाव बोडखेचे नाव घेतले ही दुर्लक्ष करतो. एका दारूड्याच्या कृत्यामुळे गावाचे नाव खराब होत असल्याने त्यांनी पुढे येऊन त्याला योग्य भाषेत समजावण्याची गरज निर्माण झाली आहे.