पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवसेना (उबाठा) गटाचे उपनेते सचिन घायाळ यांनी चार साथीदारांसह मिळून काठी, लाथाबुक्क्यांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (२९ जून) सकाळी साडेआठला पैठणमध्ये घडली. उसाचे पेमेंट देतो, म्हणून या शेतकऱ्याला घरी बोलावले होते. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पैठण पोलिसांनी घायाळ यांच्यासह चौघांविरुद्ध रविवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल केला.
सचिन घायाळ हे श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा असून, काही दिवसांपूर्वीच त्यांना ठाकरे गटाने उपनेतेपद दिले आहे. श्री संत एकनाथ साखर कारखान्याला शेतकरी राहुल सोमनाथ कांबळे (वय ३१, रा. कांचनवाडी) यांनी मागील गळीत हंगामात ऊस दिला होता. काही पेमेंट मिळाले. उर्वरित पेमेंटसाठी ४ महिन्यांपासून घायाळ टाळाटाळ करत होते. रविवारी सकाळी कांबळेंना घायाळ यांनी पेमेंट घेण्यासाठी घरी बोलावले. मात्र घरी आल्यानंतर सचिन घायाळ यांच्यासह अमोल घायाळ, सुनील घायाळ, रवींद्र थोटे यांनी मारहाण केली. तुला पेमेंट देत नाही, काय करायचे ते कर, असेही धमकावले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली मुळे यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला असून, घायाळ यांची ठाकरे गटाने उपनेते पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.