छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य अभ्यासक्रम राबविण्यात येऊन कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज. २७ जूनला छत्रपती संभाजीनगरात केले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मराठवाडा ऑटो क्लस्टर यांच्या वतीने उद्योजकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वाळूज औद्योगिक वसाहतीतील मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष रवींद्र वैद्य, कौशल्य विकास विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, मनोज पांगारकर, उद्योजक राम भोगले, मुनिश शर्मा, विनय झोटे, प्रवीण घुगे आदी उपस्थित होते. कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले, की कौशल्य विकास प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य यातील तफावत दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी उद्योजकांकडून या सूचना मागविण्यात येत आहेत. शासनाच्या ४२७ आणि खासगी ५५० आयटीआयमध्ये उद्योगांच्या गरजेनुसार प्रशिक्षणाची सुविधा दिली जाईल. उद्योजकांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम द्यावेत. त्यानुसार युवक, युवतींना प्रशिक्षण दिले जाईल व हे कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ हे उद्योगांसाठी उपलब्ध करून देता येईल. यातून बेरोजगार युवक, युवतींना रोजगार उपलब्ध होईल व उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल. त्यामुळे उद्योगजगत व शासन यांनी सोबत येऊन हा उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले. प्रा. मुनिष शर्मा यांनी तयार केलेल्या स्किल गॅप स्टडी रिपोर्टचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. उद्योजकांच्या प्रश्नांना श्री. लोढा यांनी उत्तरे दिली.