छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात आलेल्या उद्योजकांकडे असलेल्या रिक्त जागांवर आपल्या कौशल्य व प्रशिक्षणानुसार प्राप्त होणाऱ्या रोजगार संधीचा युवक, युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज, २७ जूनला छत्रपती संभाजीनगरात केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन कांचनवाडीतील छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन मंत्री लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त विद्या शितोळे, छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एस. आर. वराडे, मनोज पांगारकर आदी उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले, की कौशल्य विकास करण्याची संकल्पना आपल्या देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राबविली. उद्योगांना आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यासाठी योग्य ते कौशल्य शिकविण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी आयटीआय आणि उद्योजक यांच्या समवेत शासन काम करीत आहे. त्यामुळे आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. प्रास्ताविक विद्या शितोळे यांनी केले. आभार प्रदर्शन सुरेश वराडे यांनी केले. प्राचार्य डोंगरे यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास अभ्यासक्रमांची माहिती दिली.
नामांकीत कंपन्यांचा सहभाग आणि १२८३ पदे
मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर येथील हर्मन फिनोकेम लि., धुत ट्रान्समिशन प्रा.लि., ऑस्बॉर्न लिप्पर्ट (ई) प्रा. लि., अलंकार इंजिनिअरींग इक्विपमेंट प्रा.लि., टॉवर मेकॅनिक प्रा.लि., बी.जी. लिन इलेक्ट्रॉनिक्स, वरुण बेवरेजेस लि. पैठण, औरंगाबाद ऑटो अॅन्सीनरी प्रा. लि., अजंठा फार्मा लि. चितेगाव /पैठण, किंग फूडटेक प्रा. लि. पैठण, एक्सेल प्लेसमेंट, व्हिजुअल इन्फोसिस्टम प्रा. लि. , मिनाक्षी अॅग्रो इंडस्ट्री एल. एल. पी, हिंदुस्तान कंपोजीट लि., उमासन्स ऑटो कॉम्प प्रा. लि. ओ. एम. आर. बागला ऑटोमोटिव्ह लि., फोरेस इंजिनियरींग (ई) प्रा. लि., टिम प्लस एच. आर. सर्व्हिसेस प्रा.लि., टि. के. प्रेसिजन प्रा.लि. ,फ्लिपकार्ड होलसेल बेस्टप्राइस वालमार्ट, मेधावी एस्पायर प्रा. लि., साई सुप्रीम प्रा. लि., अर्पिता इंजिनिअरिंग प्रा. लि., व्हेरोक इंजिनिअरिंग प्रा.लि.,एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा.लि.,बी. जी. इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.,अजित सीड्स प्रा. लि., एन्कोर हेल्थकेअर प्रा. लि. आदी नामांकीत कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या नियोक्त्यांकडे १२८३ पदे उपलब्ध आहेत.