छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गेल्या आठवड्यात एम्ब्रिको कंपनीने १ हजार कोटी, उनो-मिंडा कंपनीने २१० कोटी रुपयांची गुंतवणूक छत्रपती संभाजीनगरात करण्याची घोषणा केल्यानंतर चालू आठवड्यात आणखी ६ कंपन्यांनी बिडकीन डीएमआयसीत १२६१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केल्याने शहराच्या उद्योग क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे ३ हजार २८८ रोजगारनिर्मिती होणार आहे.
बिडकीन डीएमआयसी सध्या ८ हजार एकरची असून, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक सुविधा उपलब्ध आहेत. मेटलमन ग्रुपला ७ एकर जागा लागणार असून ते १८७ कोटींची गुंतवणूक करणार आहेत. त्यांच्याकडून ५८८ जणांना रोजगार मिळेल. राखो इंडस्ट्रीजला ७ एकर जागा लागेल, ते ९३ कोटी रुपये गुंतवणूक करणार आहेत. ५५० लोकांना रोजगार देणार आहेत. टोयडा गोसाई कंपनी १० एकर जागा घेणार असून, १४० कोटी रुपये गुंतवणार आहे. ५०० लोकांना रोजगार देणार आहे. महिंद्रा असेलो कंपनी १३ एकर जागा घेणार असून, ३५५ कोटी रुपये गुंतवणार आहे. २०० लोकांना रोजगार देणार आहे.
जुन्ना सोलार कंपनी १० एकर जागा घेणार असून, ४०० कोटी रुपये गुंतवणार आहे. १०५० लोकांना रोजगार देणार आहे. एन.एक्स. लॉजिस्टिक कंपनीला १३ एकर जागा लागणार आहे. ते ८३ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. ४०० लोकांना रोजगार देणार आहेत. गेल्यावर्षी टोयटा-किर्लोस्कर, एथर एनर्जी, जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी आणि लुब्रिझोल या कंपन्यांनी बिडकीन डीएमआयसीत गुंतवणुकीची घोषणा केली होती. शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीत आतापर्यंत ३१९ कंपन्यांना भूखंड दिलेले असून, त्यात ८८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. ८० कंपन्यांनी उत्पादनही सुरू केले आहे. १०५ कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे. नव्या ६ कंपन्यांना नुकतेच देकारपत्र देण्यात आले आले आहे.