छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभागरचना ३० जूनपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रभाग रचनेसंदर्भात आढावा बैठक घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी डॉ.सुचिता शिंदे, सर्व तहसीलदार व गटविकास अधिकारी ,नायब तहसीलदार व प्रभाग रचना संदर्भातील संबंधित कर्मचारी उपस्थित होते. या संदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार नागरिकांना विश्वासात घेऊन प्रभागरचना प्रक्रिया पूर्ण करावी. आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर १४ जुलैपर्यंत सूचना व हरकती प्रसिद्ध करून त्या मागविणे, त्या आधी ३०जूनपर्यंत प्रभाग रचना तयार करावी.
प्रभाग रचनेसंदर्भात येणाऱ्या सूचना हरकती याविषयी लेखी नोंद, सूचना, हरकतीच्या लेखी नोंद पंचायत समिती तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाचे संकेतस्थळ, आणि विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रभाग रचने संदर्भाची माहिती प्रसिद्ध करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये ६३ गट आणि १२६ गण असून यानुसार प्रभाग रचना प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. २०१७ च्या लोकसंख्येच्या नुसार प्रभाग रचना ही कायम राहून यानुसारच निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.