छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँका अडवणूक करत असून अनेक अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने महाराष्ट्र बँकेवर सोमवारी (२३ जून) मोर्चा काढला. कारचालकांना एक दिवसात लोन मिळते, मात्र शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित ठेवून चकरा मारायला का लावता, असा जाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी या वेळी बँक अधिकाऱ्यांना विचारला.
महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेत अग्रणी व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. या वेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी ठाकरे गटाला उडवाउडवीची उत्तरे दिली. या वेळी आंदोलनात महानगरप्रमुख राजू वैद्य, किसानसेना जिल्हाप्रमुख नाना पळसकर, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, जिल्हा संघटक आशा दातार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. आ. दानवे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करताना सिबिल बघू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. तरीही बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर करताना सिबिलची अट घालून त्रास देत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले.