- Marathi News
- सिटी क्राईम
- खुनाच्या घटनेनंतर पोलीस, महापालिकेची मुकुंदवाडीत ‘महामोहीम’; २२९ अतिक्रमणे जमीनदोस्त, ५०० पोलिसांचा
खुनाच्या घटनेनंतर पोलीस, महापालिकेची मुकुंदवाडीत ‘महामोहीम’; २२९ अतिक्रमणे जमीनदोस्त, ५०० पोलिसांचा कारवाईला बंदोबस्त, ७ तास जेसीबींचा रौद्रावतार…

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मांस कापण्याच्या सुऱ्याने कुरेशी चिकन शॉपच्या मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने नितीन सोनाजी संकपाळ (वय ३५, रा. राजनगर, मुकुंदवाडी) या निष्पाप तरुणाची हत्या केली, त्याचा भाऊ सचिन सोनाजी संकपाळ (वय ३२), मित्र दत्ता बालाजी जाधव (रा. राजनगर, मुकुंदवाडी) या दोघांवर वार करत गंभीर जखमी केले. त्यानंतर प्रशासन खडबडून […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मांस कापण्याच्या सुऱ्याने कुरेशी चिकन शॉपच्या मस्तान कुरेशी ऊर्फ नन्ना (वय २५) याने नितीन सोनाजी संकपाळ (वय ३५, रा. राजनगर, मुकुंदवाडी) या निष्पाप तरुणाची हत्या केली, त्याचा भाऊ सचिन सोनाजी संकपाळ (वय ३२), मित्र दत्ता बालाजी जाधव (रा. राजनगर, मुकुंदवाडी) या दोघांवर वार करत गंभीर जखमी केले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. गुरुवारी (१९ जून) रात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलीस आणि महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (२० जून) सलग ७ तास विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून मुकुंदवाडी ते चिकलठाणापर्यंतची २२९ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. ५०० पोलिसांचा आणि १५० महापालिका कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, १० जेसीबी, ८ टिप्पर, २ रुग्णताहिका, २ कोंडवाड्याची वाहने असा ताफाच या मोहिमेत एकजूट करण्यात आला होता. दुपारी १२.३० वाजता सुरू केलेली मोहीम रात्री साडेसात वाजता थांबली!
-अतिक्रमणे काढल्यानंतर दुकानांच्या शेड, पत्र्याचा मलबा पडून होता. व्यावसायिकांनी मलबा उचलण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
-या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी एमआयडीसीची हद्द होती, तत्कालीन आमदार डॉ. कल्याण काळे आणि तत्कालीन उद्योगमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कार्यकाळात अतिक्रमणधारकांना नियमाप्रमाणे प्लॉट देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. मात्र नंतर हा निर्णय अंमलात आला नव्हता.
-कारवाईत भाजप आमदार अतुल सावे, नारायण कुचे व इतर कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप अतिक्रमणधारकांनी केला.
-कारवाईविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यावसायिकांनी केला. यासाठी आज, २१ जूनला बैठक आयोजित केली आहे.
-संजयनगर गल्ली नं.१ मध्ये राजेश पवार यांचे घर पाडण्यास सुरुवात झाली तेव्हा राजेशने अंगावर रॉकेल ओतून घेतले.
-कारवाईमुळे व्यावसायिकांचे किमान ८ ते १० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
-मुकुंदवाडी स्मशानभूमीला लागून एक जुन्या दुचाकी विक्रीचे दुकान होते. त्यामुळे पथकाने मोठ्या वाहनात सर्व दुचाकी भरून गरवारे स्टेडियमवर नेल्या, नंतर ते शेड जमीनदोस्त केले.
-पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्या नेतृत्वात ३ सहायक पोलीस आयुक्त, ८ पोलीस निरीक्षक, १० सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह वाहतूक, दंगा काबू, आरसीपीसह पोलीस ठाण्यातील ५०० पोलिसांचा बंदोबस्त होता.
-अतिक्रमणधारकांना शनिवार आणि रविवार अशी दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून, दोन दिवसांत स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, अशी सूचना महापालिकेने केली आहे. सोमवारपासून पुन्हा जोरदारपणे कारवाईला सुरुवात होणार आहे.
-कारवाईवेळी मुकुंदवाडी भागात महापालिका, पोलिसांची वाहने, जेसीबी, पोलिस, मनपाचा फौजफाटा भरपूर होता. त्यामुळे दिवसभर वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता.
-अनेकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. रस्ता आणि सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
काय म्हणाले पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त….
खुनाच्या घटनेनंतर पाहणी केली तेव्हा दुकाने अतिक्रमण करून उभारलेली दिसली. त्यामुळे महापालिकेशी संवाद साधून अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय घेतला. यापुढेही अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिकेला पोलीस बंदोबस्त देणार आहे. रस्ते मोकळे झाले पाहिजेत. त्यामुळे अनेक समस्या सुटण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. महापालिका आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, की अतिक्रमणांमुळे रस्ता अरूंद होत गेला, काही ठिकाणी सर्व्हिस रोड गायबच झाला आहे. या भागात संपूर्ण कारवाई केली जाईल. वॉर्ड अभियंत्याला सर्व्हिस रोडसाठी अंदाजपत्रकही तयार करण्याचे आदेश दिले आहेत. जालना रोड, जळगाव रोड, पैठण रोडवरील अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे काढून घ्यावीत. या ठिकाणीही कारवाई करणार आहोत. नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार नाही, असे ते म्हणाले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
