यवतमाळ (सीएससीएन वृत्तसेवा) : तरुणीला आत्महत्येची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या २४ वर्षीय युवकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी त्याने आत्महत्येचे नाटक करत तरुणीचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. रोशन विठ्ठल गोबाडे (वय २४, रा. नांदेपेरा, ता. वणी, जि. यवतमाळ) असे तरुणाचे नाव आहे.
पीडित तरुणी १६-१७ वर्षांची असताना व ती महाविद्यालयात शिकत असताना तिच्यापेक्षा वयाने तीन ते चार वर्षे मोठ्या असलेल्या रोशन विठ्ठल गोबाडे याच्या संपर्कात आली. त्याने तिला लग्न करण्याचे वचन दिले. त्यानंतर त्याने फेब्रुवारी व मार्च २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. दरम्यान, पीडितेने यासाठी विरोध केला. विरोध करताच आरोपी तिला आत्महत्येची धमकी देऊन तिचे शोषण करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत पीडितेचे लग्न जुळले. त्यामुळे पीडितेने रोशनसोबत बोलाचाली बंद केली. तसेच भेटीही टाळल्या.
मात्र, रोशन भेटण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्यासाठी त्याने तिच्या होणाऱ्या पतीला, नातेवाइकांना व्हिडीओ पाठविले. मंगळवार, १७ जून रोजी रोशनने आत्महत्येचा फार्स केला. नांदेपेरा परिसरातील एका झाडावर आत्महत्या करण्यासाठी दोर बांधत असल्याचा व्हिडीओ रोशनने समाज माध्यमांवर व्हायरल केला. त्यामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, रोशन तेथे आढळून आला नाही. तरुणीने वणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन रोशनविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी रोशन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. अत्याचार झाला तेव्हा पीडिता ही अल्पवयीन होती त्यामुळे पोलिसांनी पॉक्सोनुसार गुन्हा दाखल केला.