छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहराजवळील माळीवाडा परिसरात रेल्वेचा कंटेनर डेपो असून, या डेपोला बुधवारी (१८ जून) रात्री साडेआठला भीषण आग लागली. यात तीन कंटेनरसह मोठी क्रेन जळाल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर येत आहे. टर्मिनल मॅनेजर लपवालपवी करत असल्याने मोठ्या नुकसानीची आणि आगीमागे मानवी चुकीची शक्यता नाकारता येत नाही. नक्की किती नुकसान झाले, याबद्दल आज, १९ जूनच्या पहाटेपर्यंत संभ्रमावस्था कायम आहे.
बुधवारी रात्री ८:३० वाजता पदमपुरा अग्निशमन केंद्राला रेल्वे कंटेनर डेपोला आग लागल्याचा पहिला कॉल आला. उपअग्निशमन केंद्राधिकारी अशोक खांडेकर, संजय कुलकर्णी तातडीने सहकाऱ्यांसह रवाना झाले. एका क्रेनसह तीन कंटेनरने पेट घेतल्याचे दिसून आले. डेपोमधील इंधनामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग मानवीचुकीमुळे लागली असावी, असा संशय टर्मिनल मॅनेजरच्या एकूणच लपवालपवीमुळे व्यक्त करण्यात येत आहे.
दोन बंबांच्या साहाय्याने अग्निशमन दलाचे सूरज राठोड, शिवसांब कल्याणकर, अमिताभ कराड, दीपक गाडेकर, विक्रांत बकले, अजिनाथ खिल्लारे यांनी आग आटोक्यात आणली. टर्मिनल मॅनेजरच्या एकूणच हालचाली संशयास्पद असून, आग मोठी असतानाही त्यांनी बाहेर कोणाला कळू नये म्हणून प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. मात्र आग वाढतच गेल्याने अखेर अग्निशमन विभागाला पाचारण केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिला नाही. रेल्वेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील माल या ठिकाणी येतो.
वळदगावमध्ये रोडरोलरला अचानक आग…
सिडको प्रशासनाने वळदगाव येथील गट नं. ४१ ते ४५ दरम्यान व्यावसायिक भूखंडांची निर्मिती केली असून, या भागात ड्रेनेज लाइन, पथदिवे, रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरणाची कामे केली जात आहेत. बुधवारी (१८ जून) डांबरीकरणाचे काम पूर्ण करून रोडरोलर पार्किंगकडे जात असताना त्याच्या इलेक्ट्रिकल पॅनलमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. चालक संजय खिल्लारे यांनी उडी मारून स्वतःचा जीव वाचवला. मात्र रोडरोलर पेटल्याने आगीचे मोठे लोळ उठले. अग्निशमन दलाच्या २ गाड्यांनी आग विझवली. रोडरोलरचे पूर्ण नुकसान झाले.