छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिडको एन ४ च्या समई गार्डनमध्ये विचित्रच घटना समोर आली आहे. एक तरुण मित्रांसोबत बोलत उभा असताना अचानक एक जण आला आणि तरुणाचा कान पिळून म्हणाला, तुझा कान चिपकललेला आहे. तो कापून टाकतो… अन् एकाएकी मारहाण करू लागला. त्याचे ३ साथीदार आले आणि त्यांनीही तरुणाला विनाकारण मारहाण केली. ही घटना सोमवारी (१६ जून) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
सौरभ विनोद झारे (वय २४, रा. मुकुंदवाडी राजनगर) या तरुणाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो खासगी नोकरी करतो. त्याचे वडील शेती करतात. सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तो त्याचा मित्र शाश्वत कासलीवाल, निशू वर्मा, प्रणव गायकवाड, कौशल पाटील यांना भेटण्यासाठी सिडको एन ४ येथे आला होता. समई गार्डनच्या बाहेर मित्रांसोबत बोलत उभा असताना अचानक तेथे एक जण आला. त्याने सौरभचा कान पिळला आणि म्हणाला, तुझा कान चिपकलेला आहे, तो कापून टाकतो, असे म्हणून चक्क सौरभच्या कानामागे मारली. तितक्यात त्याच्या ओळखीचे आणखी ३ जण आले. त्यांनीही काही एक कारण नसताना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी सौरभ यांना मारहाण सुरू केली.
एकमेकांना सामान काढ, असे सांगत त्यातील आधी आलेल्या व्यक्तीने त्याच्याजवळील चाकूने सौरभला पाठीत मारून जखमी केले. तेथे असलेल्या सौरभच्या मित्रांनी सोडवा सोडव करून सौरभला बाजूला केले. सौरभ मोटारसायकलीवर बसून तेथून घरी निघून जात असताना चाकू मारणारा व्यक्ती परत त्याच्या मोटारसायकलीवर मागे बसला. पाठीत हाताचापटाने मारले. त्यावेळी मित्रांनी त्यास ओढून मोटारसायकलीवरून उतरवले. त्यानंतर सौरभने पुंडलिकनगर पोलीस ठाणे गाठले. मित्रांकडून सौरभवला हल्लेखोरांची नावे कळली. चाकूने मारणाऱ्याचे नाव राम राठोड (रा. हनुमाननगर ग. नं. ५) व त्याच्या सोबत असलेल्यांची नावे अक्षद रमेश केरे, विर, मयूर अशी असल्याचे समजले. अधिक तपास पोलीस अंमलदार विश्वास चौधरी करत आहेत.