छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भांडणात एका युवकाने अक्षरशः लाज सोडल्याचा प्रकार वाळूज एमआयडीसीतील कमळापूरमध्ये समोर आला आहे. महिलांच्या भांडणात भाग घेऊन या युवकाने एका महिलेला अश्लील शिवीगाळ करत अश्लील हातवारे केले. त्याचा व्हिडीओच महिलेने पोलिसांत दिला आहे. पोलिसांनी तिला मारहाण करणाऱ्या दोन महिलांसह अश्लील इशारे करणाऱ्या युवकासह त्याच्या लहान भावाविरुद्ध मंगळवारी (१७ जून) गुन्हा दाखल केला आहे.
कमळापूर येथील ३२ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पती व मुलीसह राहतात. त्यांचे पती खासगी कंपनीत काम करतात. शनिवारी (१४ जून) सकाळी आठला बोअरचे पाणी भरण्यासाठी सोसायटीतील सामायिक पाण्याची मोटर त्यांनी घरातील वायर जोडून चालू केली. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या अनिता जाधव व प्रियांका जाधव यांनी त्यांच्या वायरचे कनेक्शन काढून त्यांचे वायरचे कनेक्शन जोडले व बोअरचे पाणी बंद केले. त्यामुळे महिला त्यांना विचारणा करण्यास गेली असता अनिता जाधव, प्रियांका जाधव यांनी शिवीगाळ सुरू केली. महिलेला हाताचापटाने मारहाण केली. त्यानंतर दुपारी १२ ला प्रियांकाचा नवरा प्रफुल्ल जाधव व त्याचा लहान भाऊ (नाव माहीत नाही) महिलेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागले.
महिला घराबाहेर आली असता प्रफुल्ल जाधव महिलेच्या अंगावर मारण्यासाठी धावून आला. त्यांना लज्जा वाटेल असे अश्लील हातवारे करू लागला. प्रफुल्ल जाधव शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ महिलेने मोबाइलमध्ये काढला. त्यावर अनिता हिने महिलेचा मोबाइल हिसकावून घेत जोरात जमिनीवर आपटून फोडून मोबाइलचे नुकसान केले. पोलिसांनी प्रफुल्ल जाधव, अनिता जाधव, प्रियांका जाधव आणि प्रफुल्लचा लहान भाऊ अशा चौघांविरुद्ध मंगळवारी (१७ जून) गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.