छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जळगाव रोडवरील सिडकोच्या मुख्य कार्यालयातील सुरक्षारक्षक दिलीप रामराव ढाले (वय ५२) याने अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताखाली लाचखोरी सुरू केली. त्याच्या लाचेचा ‘मोठा’ वाटा कुणाला जात होता, याचा शोध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) घेत आहेत. एसीबीने ढालेला मंगळवारी (१७ जून) दुपारी एक वाजता एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.
भूखंड खरेदीची नोंदणी व चालान देण्यासाठी त्याने २१ वर्षीय तरुणाकडून लाच घेतली. तरुणाच्या वडिलांनी तिसगावमध्ये सिडकोचा भूखंड खरेदी केला होता. त्याची नोंदणी करून चालान काढण्यासाठी तरुण अनेक दिवसांपासून सिडकोच्या मुख्य कार्यालयात चकरा मारत होता. अखेर अधिकाऱ्यांनी त्याला ‘साहेब’ बनलेल्या ढालेला भेटायला सांगितले. ढाले याने १२ जून रोजी त्याला १ हजार रुपयांची मागणी केली.
तरुणाने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून त्याला मंगळवारी अटक केली आहे. ढाले हे सिडकोचा चक्क साहेब बनला होता. तो एकमेव असा सुरक्षारक्षक आहे, जो १० वर्षांपेक्षा अधिक काळ मानधनावर सिडको कार्यालयात काम करत आला आहे. अनेक सुरक्षारक्षक बदलले गेले, पण ढाले अधिकाऱ्यांची विशेष मर्जी आढळली. ढालेला स्वतंत्र दालन असून, त्याच्या नावाचे कपाटही होते. त्यात अनेक महत्त्वाच्या फाइल, कागदपत्रे आढळली. भूखंड, चालानच्या कामासाठी अर्जदारांना त्याच्याकडे पाठविले जायचे. त्यामुळे ढाले हा कुणासाठी लाचखोरी करत होता, हे शोधणे गरजेचे बनले आहे.