छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुसाट कारने इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चिरडून पळ काढला. यात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्याच्या काकाने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार देताना कारचा नंबर दिला आहे. या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची गरज असताना पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सोमवारी (१६ जून) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नारेगावच्या जयभवानी चौकात वाशिंग सेंटरजवळ रविवारी (१५ जून) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली.
ओम अजय महाजन (वय २१, रा. संजयनगर बायजीपुरा छत्रपती संभाजीनगर, ह. मु. नारेगाव सोनवणे मामा यांच्या घरात किरायाने) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विजय अशोक महाजन (वय ४३, रा. संजयनगर छत्रपती संभाजीनगर) यांच्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम हा विजय यांचा पुतण्या आहे. रविवारी (१५ जून) सकाळी पावणेनऊला त्यांची वहिणी कविता अजय महाजन यांनी फोन करून सांगितले की, ओमचा नारेगाव चौकात अपघात झाला असून, तुम्ही लवकर जा. त्यानंतर विजय हे नारेगाव जयभवानी चौक वाशिंग सेंटरजवळ आले असता, त्या ठिकाणी ओमची मोटारसायकल (MH20 GR 7901) तेथील लोकांनी बाजूला उभी केली होती.
लोकांनी सांगितले की, ओम जयभवानीनगर चौकाकडून नारेगावकडे जात असताना कारने (MH20 FY 0505) भरधाव वेगाने धडक देऊन त्याला गंभीर जखमी करून तेथून पळून गेला. पळून जात असताना तेथील एका व्यक्तीने मोबाइलमध्ये कारचा नंबरचा फोटो काढला होता. ओमचा मित्र आशिष रवी दौड याने व त्याच्या मित्राने रिक्षात टाकून ओमला एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. तिथून घाटी रुग्णालयात हलविले असताना उपचारादरम्यान ओमचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे, कारचा नंबर देऊनही या प्रकरणात पोलिसांनी थेट कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याएवेजी अनोळखी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पंडित चव्हाण करत आहेत.