मुंबई (सीएससीएन वृत्तसेवा) : पती सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या युवतीला वडिलांचा कडाडून विरोध होता. त्यामुळे तिच्या प्रियकराने त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईत समोर आली आहे. मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी युवतीसह तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राहुल शंकर कांबळे (वय २८, रा. जगताप चाळ, जय भवानी स्पोर्ट्स क्लब, भटवाडी, घाटकोपर पश्चिम मुंबई) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो आणि त्याचे वडील शंकर रामचंद्र कांबळे (वय ५८) असे सोबत राहत होते. त्याची आई अलका यांचे २०२० मध्ये निधन झाले आहे. तो मरोळ पाईपलाईन येथे इन्फोटेक कंपनीत खासगी कंपनीत नोकरी करतात. त्याचे वडील लाईटेरिया हाऊस, मरोळ नाका, अंधेरी पूर्व मुंबई येथे हाउसकीपिंगमध्ये नोकरीला होते. राहुलला मोठी बहीण सोनाली अमोल बाईत (वय ३७) असून, तिचे लग्न २००८ मध्ये झाले होते. ती पतीसोबत घाटकोपर पश्चिम मुंबई येथे राहत होती. तिला पतीपासून दोन अपत्ये झाली. एक १७ वर्षांची मुलगी असून, १३ वर्षांचा मुलगा आहे. तिचा पती अमोल खासगी नोकरी करतो.
मात्र सोनालीने २०२२ मध्ये पती, दोन मुलांना सोडून प्रेमसंबंध निर्माण झालेल्या महेश पांडे या व्यक्तीसोबत २०२२ पासून लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. तेव्हापासून तिचा भाऊ, वडील, पती, मुलांसोबत कोणताही संपर्क नाही. ८ जून २०२५ रोजी शंकर कांबळे कामावर असताना तेथे सोनाली व महेश पांडे आले. सोनाली व वडिलांत चर्चा चालू असताना महेशने शंकर कांबळे यांच्या कानाखाली चापट मारली. त्यामुळे त्यांनी मुलगा राहुलला कॉल करून बोलावले. राहुल आला, पण मात्र तोपर्यंत सोनाली व महेश तिथून निघून गेले होते. सोनालीच्या अनैतिक नात्याला विरोध केल्याने महेशने मारहाण केल्याने शंकर कांबळे यांनी राहुलला सांगितले. ९ जूनला सकाळी शंकर कांबळे यांनी सोनालीला घरी बोलावले. ती घरी आली. घरी आल्यावर राहुलने तिला महेशने वडिलांना का मारहाण केली, असे विचारले असता तिने राहुलशी हुज्जत घातली. त्यानंतर राहुलने वडील शंकर कांबळे आणि सोनालीला घेऊन चिरागनगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांत तक्रार केली. त्यावर पोलिसांनी महेशला बोलावून घेतले.
पोलिसांनी महेश व सोनालीला समज देऊन सोडून दिले. बुधवारी (११ जून) सायंकाळी साडेपाचला शंकर कांबळे यांनी मुलगा राहुलला कॉल केला व सांगितले, सोनाली व महेश हे महेश लंच होम, अंधेरी कुर्ला रोड, सागबाग, मरोळ या ठिकाणी गाठून मला मारहाण करत आहेत. त्यामुळे राहुल लगेचच त्या ठिकाणी आला. तिथे सोनाली व महेश पांडे हे शंकर कांबळे यांना मारहाण करत होते. राहुलने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी राहुललाही मारहाण सुरू केली. महेश शंकर कांबळे यांच्या छातीवर जोरात ठोसा मारला. त्यामुळे शंकर कांबळे अस्वस्थ होऊन खाली पडले. जमलेल्या लोकांनी भांडण सोडवले. त्यानंतर राहुलने वडिलांना तेथून बाजूला नेले असता त्यांच्या तोंडाला फेस येऊन ते बेशुद्ध पडले. तेथील लोकांच्या मदतीने त्याने वडिलांना उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.