दमदार अभिनयाने साउथ चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री कृती खरबंदा हिने शादी में जरूर आना, तैश आणि हाऊसफुल ४ सारख्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्येही ठसा उमटवला आहे. आता ती राणा नायडू २ या वेब सिरीजद्वारे ओटीटीमध्ये प्रवेश करणार आहे. यानिमित्ताने घेतलेली तिची विशेष मुलाखत….

कोणतेही संकट मला मागे आणून शकत नाही…
राणा नायडू २ मधील आलिया ओबेरॉय हे पात्र तिच्या ओटीटी पदार्पणासाठी निवडण्याचे कारण विचारले असता कृती म्हणाली, आलिया ओबेरॉयचे अनेक गुण माझ्या स्वतःच्या आयुष्याशी जुळतात. आलिया ही एक अशी मुलगी आहे जी पुरुषांच्या जगात स्वतःचे नाव कमावण्याचा प्रयत्न करत आहे. ती मुलींना भेडसावणाऱ्या लिंगभेदाच्या समस्येशी लढत आहे. ती खूप प्रतिभावान आहे. तिच्यात खूप क्षमता आहे, पण एक महिला असल्याने, स्वतःचे स्थान निर्माण करणे तिला अवघड जात आहे. तिला माहीत आहे की तिची स्वप्ने साध्य करण्यासाठी तिला काय करावे लागेल, पण ती स्वतः डागही लागू देत नाही. जरी आलिया अधिक स्पष्टवक्ता, अधिक धाडसी आहे, मी तितकीशी नाही, परंतु तिच्या जशा महत्त्वाकांक्षा आहेत आणि तिचे स्वतःवर प्रेम आहे, तसेच माझेही आहे. माझ्यातही हे गुण आहेत की मला जे करायचे आहे ते करतेच. मी शेवटपर्यंत माझ्या स्वप्नांसाठी लढते. मी कधीही हार मानत नाही. मी ती १७ वर्षांची मुलगी होते, जिला बॉलीवूड इंडस्ट्रीबद्दल काहीही माहिती नव्हती. मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडपासून सुटका मिळवण्यासाठी अभिनेत्री बनले. ब्रेकअपनंतरही तो मला सोडत नसल्याने मी बंगळुरू सोडले. मी २१ वर्षांची असताना माझ्या वडिलांचा संपूर्ण व्यवसाय सांभाळला आणि घर चालवण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. मला सर्वांची काळजी घ्यावी लागत होती.

त्यांचे घाणेरडे हेतू बदलता येत नसतील तर स्वतःला बदला…
अलीकडेच, कृतीची राणा नायडू २ मधील सह-कलाकार सुरवीन चावला हिच्या अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचचे कटू अनुभव शेअर केले. चित्रपटांचे सेट मुलींसाठी सुरक्षित ठिकाण कसे बनवता येतील? या प्रश्नावर कृती म्हणते, की मी माझ्या आयुष्याचा बराचसा भाग याबद्दल विचार करण्यात घालवला आहे. कारण या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकीसोबत अशी घटना कधी ना कधी घडतेच. मला अशा विचारसरणीच्या लोकांचा दृष्टिकोन कसा बदलायचा हे माहीत नाही. म्हणून मी स्वतःला खूप बदलले आहे. एक काळ असा होता जेव्हा मला माहीत होते की मला त्या मिटिंगसाठी जावे लागेल. पण मला ते योग्य वाटले नाही. मग माझ्या आईने एक गोष्ट सांगितली की बेटा, मला माहीत आहे की हे खूप दुःखद आहे, पण तुला स्वतःमध्ये हा बदल आणावा लागेल. जर तुला थोडेसेही वाटत असेल की तुझा गैरफायदा घेतला जाईल, तर ते सोडून दे. कदाचित हा योग्य मार्ग नसेल, पण अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मला स्वतःला खूप मजबूत बनवावे लागले. जेणेकरून कोणीही मला त्या परिस्थितीत आणू शकणार नाही. अर्थातच आता गोष्टी बदलत आहेत. अनेक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली गेली आहेत. समित्या स्थापन केल्या गेल्या आहेत. परंतु तरीही तुम्हाला वाटते तितका बदल झालेला नाही. लोकांचा मार्ग बदलला आहे. कारण ते आता घाबरले आहेत, परंतु हेतू बदललेले नाहीत. आता ते अशा प्रकारे करतात की मी बाहेर जाऊन बोलले तर कोणी म्हणेल की यात काय चूक आहे?

चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कलाकारांना दोष देणे चुकीचे…
अलीकडेच, करण जोहर आणि अनुराग कश्यप सारख्या चित्रपट निर्मात्यांनी अभिनेत्यांच्या प्रचंड फीवर टीका केली होती आणि बॉलीवूड इंडस्ट्रीच्या वाईट स्थितीसाठी अभिनेत्यांना जबाबदार धरले होते. यावर कृती म्हणते, की मी स्वतःसाठी बोलू शकते आणि माझा असा विश्वास आहे की माझ्या पिढीतील कलाकार चित्रपटाचे बजेट वाढू नये याची खूप काळजी घेतात. चित्रपट संपल्यानंतर तुम्ही असे का बोलत आहात? तुम्ही साइन करता तेव्हा ते सांगा. चित्रपट चालला नाही तेव्हा असे का म्हटले जात आहे? तेही कोणाचेही नाव न घेता. हे बरोबर नाही, असे कृती म्हणाली.