- Marathi News
- जिल्हा न्यूज
- खुनाच्या घटनेनंतर वैजापूर, खंडाळ्यात तणाव!; उपजिल्हा रुग्णालयाची तोडफोड, खंडाळा, भायगावमध्ये दुकाने
खुनाच्या घटनेनंतर वैजापूर, खंडाळ्यात तणाव!; उपजिल्हा रुग्णालयाची तोडफोड, खंडाळा, भायगावमध्ये दुकाने पेटवली!!

वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : खंडाळा (ता. वैजापूर) येथे युवकांच्या दोन गटांत गुरुवारी (१२ जून) सायंकाळी ७.३० च्या सुमारास राडा झाला. एका गटाने तिघांना चाकूने भोसकले. यात दुसऱ्या गटातील २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मोईन मुक्तार शहा (वय २४) असे खून झालेल्याचे नाव आहे. शेख अबरार आरीफ शेख ( वय […]
वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : खंडाळा (ता. वैजापूर) येथे युवकांच्या दोन गटांत गुरुवारी (१२ जून) सायंकाळी ७.३० च्या सुमारास राडा झाला. एका गटाने तिघांना चाकूने भोसकले. यात दुसऱ्या गटातील २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मोईन मुक्तार शहा (वय २४) असे खून झालेल्याचे नाव आहे. शेख अबरार आरीफ शेख ( वय २३) व शोएब असीम पठाण (वय २३, तिघे रा. खंडाळा) हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर खंडाळ्यासह वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावाने उपजिल्हा रुग्णालयात तोडफोड केली, सोबतच खंडाळा, भायगावमध्ये प्रत्येकी एक अशी दोन दुकाने पेटवून दिली. दोन गटांतील वादाला जातीय वळण देण्याचा आणि दंगल पेटविण्याचा प्रयत्न होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामस्थही संतापले आहेत.
युवकांच्या दोन गटांत सहा महिन्यांपासून वाद आहे. गुरुवारी सायंकाळीही वाद झाल्यानंतर दोन्हीकडील युवकांची आपसात हाणामारी सुरू झाली. मोईन मुक्तार शहा, शेख अबरार आरीफ, शोएब असीम पठाण या तिघांना काहींनी चाकूने भोसकले. तिघांनाही वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मोईनचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने उपजिल्हा रुग्णालयातील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत आतील कागदपत्रांची फेकझोक केली. अबरार आणि शोएबला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वैजापूरचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सहकाऱ्यांसह रुग्णालयात धाव घेतली. खंडाळा आणि उपजिल्हा रुग्णालयात बंदोबस्त तैनात केला.
दरम्यान, खंडाळा गावातील एकाच्या दुकानातील साहित्य बाहेर काढून संतप्त जमावाने पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे, सोबतच भायगाव येथील एका सलूनच्या दुकानातील साहित्यही जमावाने बाहेर फेकून पेटवून दिले. या दोन्ही घटनांमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खंडाळ्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी गौरव राजू अनर्थ (रा. भायगाव), अक्षय सुरेश पवार, शेखर लक्ष्मण नन्नावरे, नंदू पोपट जानराव ( सर्व रा. खंडाळा) आणि अन्य तिघे अशा ७ जणांविरुद्ध वैजापूर पोलिसांनी आज, १३ जूनला पहाटे दोनला गुन्हा दाखल केला आहे. दोन संशयितांना पोलिसांनी अटकही केली आहे.