छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातून आता हैदराबादला जाण्यासाठी केवळ सायंकाळच्या वेळेतच विमान असणार आहे. सकाळची हैदराबाद विमानसेवा ऑपरेशनल रिझनमुळे १ जुलै ते २५ ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात येत असल्याचे इंडिगोने जाहीर केले आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातून इंडिगो व एअर इंडियाची दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, गोव्यासाठी विमानसेवा सुरू आहे.
चिकलठाणा विमानतळ विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जाही दिला गेला; पण अजून या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे सुरू झालेली नाहीत. वेरूळ, अजिंठा लेणी, बीबी का मकबरा पाहण्यासाठी दर वर्षी जगभरातून नागरिक, पर्यटक मोठ्या संख्येने येतात. देशांतर्गत महिन्याला साठ हजार प्रवासी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून जातात. चिकलठाणा विमानतळावरून डिसेंबर २०२४ मध्ये अहमदाबाद विमानसेवा बंद झाली. त्यानंतर नागपूर-लखनऊ विमानसेवा मार्च २०२५ मध्ये बंद झाली. त्यानंतर आता हैदराबादला सकाळी उडणारे विमान जुलैपासून बंद होणार आहे.