छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरात ४० टक्क्यांहून अधिक गुन्हेगार रिक्षा चालविण्याच्या व्यवसायात उतरल्याने त्यांच्याविरुद्ध सातत्याने कडक कारवाईची गरज आहे. तरुणींचा विनयभंग, हत्या, हाणामाऱ्या अशा घटना सातत्याने रिक्षाचालकांकडून घडत आहेत. काही दिवसांपूर्वी एका परीक्षार्थ्याची हत्या केल्याने रिक्षाचालकांविरुद्ध शहर वाहतूक पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. वाहतूक पोलीस आणि मुख्यालयातील अंमलदार यांनी मिळून मंगळवारी (१० जून) तब्बल ४४० रिक्षाचालकांची कसून चौकशी केली. बेशिस्त रिक्षाचालकांना एकूण ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
भगवान महावीर चौक, सिडको चौक, एसएफएस शाळा, व्हिट्स हॉटेल, वाळूजमध्ये एकाचवेळी सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत मोठ्या संख्येने पोलीस रस्त्यावर उतरले होते. त्यांनी गुन्हे दाखल असलेल्या रिक्षाचालकांची कसून चौकशी केली. पण नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईसुद्धा केली. गेल्या ७ महिन्यांतील ही रिक्षाचालकांविरुद्ध राबवलेली तिसरी मोहीम आहे. मात्र, तरीही रिक्षाचालकांकडून सातत्याने मोठमोठे गुन्हे घडतच आहे. त्यामुळे कारवाई सातत्य ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.
भाड्यावरून वाद घालणे, प्रवाशांची लूटमार, प्रवाशांवर चाकूहल्ला, महिला, मुलींसाेबत गैरवर्तन अशा घटना रिक्षाचालकांकडून वारंवार घडत आहेत. ४ जूनला जयराम बबन पिंपळे (वय २८, रा. वडाळा महादेव पिंपळे वस्ती, श्रीरामपूर जि. अहिल्यानगर) या परीक्षार्थ्याची मुजम्मील रफीक कुरेशी (वय २२, रा. राहुलनगर, छत्रपती संभाजीनगर) या नशेखोर रिक्षाचालकाने हत्या केली. जयराम शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात आला होता. मुजम्मीलविरुद्ध यापूर्वी कल्याण रेल्वेस्थानक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. सतत चाकू बाळगून, नशेतच तो रिक्षा चालवत होता, हे विशेष.
रिक्षाचालकांनो, वेळीच थांबवा…
गुन्हेगार रिक्षाचालकांमुळे सामान्य, प्रामाणिक रिक्षाचालक बदनाम होतात. त्यामुळे रिक्षाचालकांनीच आता आपल्या क्षेत्रातील गुन्हेगारी उखडून टाकण्याची गरज आहे. रिक्षाने प्रवास करणारा सामान्य वर्ग असतो. हाच फायदा अनेक रिक्षाचालक घेतात आणि प्रवाशांना भाड्यात लुटतात, जास्तीचे पैसे देण्यास नकार दिला अरेरावी, मारहाण करायला कमी करत नाहीत. काही गुन्हेगार रिक्षाचालक लूटमार करतात. तरुणी, महिलांसोबत गैरवर्तन करतात. मोठ्या आवाजात गाणे वाजवत सुसाट रिक्षा पळवतात. अनेकदा रिक्षांत वाजणारी गाणी महिला, तरुणींना लज्जा निर्माण करतात. विशेष म्हणजे हे सर्व वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून घडत असते. ऑनलाइन प्रक्रियेमुळे वाहतूक दंडाची भीतीच नाहीशी झाल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. अनेक रिक्षाचालक पोलिसांना दंड पाठवून द्या, असे म्हणत रिक्षा सुसाट दामटतात. त्यामुळे पोलिसांनी दंडापाठोपाठ आता खाक्याही रिक्षाचालकांना दाखविण्याची गरज आहे.