छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : महापालिकेने बीड बायपासच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे काढायला पुन्हा सुरुवात केली आहे. मंगळवारी (१० जून) दिवसभर अतिक्रमण हटाव पथकाने ९२ कच्च्या आणि पक्क्या अतिक्रमणांवर बुलडोझर घातला. व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला, मात्र तरीही कारवाई पुढे नेण्यात आली. गेल्या ८ दिवसांत एकूण ४१८ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यामुळे देवळाई चौक ते महानुभाव आश्रमापर्यंतचा दोन्ही बाजूंचा सर्व्हिस रोड मोकळा झाला आहे.
बकरी ईदमुळे दोन दिवस मोहिमेला विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा पथक कारवाईसाठी सज्ज झाले. महानुभाव आश्रम चौकाकडून कारवाई सुरू करताच व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला. एकत्र येऊन त्यांनी आक्रमकपणे आम्हाला वेळ द्या, अशी मागणी केली. व्यापारी मागे हटायला तयार नसल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. मात्र पथकप्रमुख संतोष वाहुळे यांनी त्यांना सांगितले, की बकरी ईदनिमित्त दोन दिवसांचा वेळ दिला होता. स्वतःहून अतिक्रमणे का काढून घेतली नाही? आता कारवाई थांबणार नाही, असे म्हणत त्यांनी विरोध मोडीत काढून दिवसभरात ९२ लहान-मोठ्या अतिक्रमणे पाडली. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांकडून ६७ हजार रुपये दंडही वसूल केला. ही कारवाई महापालिका उपायुक्त सविता सोनवणे, नगररचना विभागाचे उपअभियंता शिवाजी लोखंडे, सचिन कुमावत, इमारत निरीक्षक कुणाल भोसले, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ, नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव यांच्या पथकाने केली.