छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील नांदेडा येथून १६ वर्षीय मुलीचे तरुणाने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. तिला मध्यरात्री झोपेतून उठवून पळवून नेण्यात आले आहे. मुलीच्या आईने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राहुल अंबादास राजपूत (रा. चिंचबन, ता. नेवासा, जि. नगर) असे संशयित तरुणाचे नाव आहे. मुलगी विटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील असून, ती सातवीपर्यंत शिकली आहे. रविवारी (८ जून) रात्री ९ ला सर्वजण जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री १ ला आजी पाणी पिण्यासाठी उठली असता मुलगी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी सर्वांना उठवून मुलगी जागेवर नसल्याचे सांगितल्यानंतर खळबळ उडाली. मुलीचा आजूबाजूला, नातेवाइकांकडे शोध घेतला. अखेर कुटुंबाला कळले, की त्यांच्यासोबत काम करणारा राहुल तिल पळवून घेऊन गेला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करत आहेत.
जोगेश्वरीतून १५ वर्षीय मुलीचे अपहरण
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगेश्वरी येथूनही एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी (९ जून) समोर आली. मुलीच्या मावशीने या प्रकरणात पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या बहिणीची १५ वर्षीय मुलगी त्यांच्याकडे २ जूनला सुट्यांमुळे आली होती. ८ जूनला सायंकाळी साडेसातच्या सुमारास कुरकुरे आणण्यासाठी मावशीकडून ५ रुपये घेऊन ती गेली. त्यानंतर परतलीच नाही. दुकानदाराने सांगितले, की कुरकुरे घेण्यासाठी आलीच नाही. मुलीचा आजूबाजूला, परिसरात, नातेवाइकांकडे, बसस्थानक, रेल्वेस्टेशन सगळीकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. अखेर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास विनोद आबूज करत आहेत.