वैजापूर (गणेश निंबाळकर : सीएससीएन वृत्तसेवा) : वैजापूरमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंगळवारपासून (१० जून) सुरू झाले आहे. कामकाजाला सुरुवात करण्यात आली असून, वैजापूरसह गंगापूर तालुक्यातील वाहनांसंबंधी कामकाज चालणार असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाहनांवर आता एमएच २० बरोबरच एमएच ५७ असा नंबर दिसू लागणार आहे.
कार्यालयाच्या औपचारिक उद्घाटनावेळी एका वाहनधारकाने चॉईस नंबरसाठी डिमांड ड्राफ्ट (डीडी) जमा केला. या वेळी आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांची प्रमुख उपस्थिती होती. लवकरच परिवहन मंत्र्यांच्या हस्ते या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा होणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यालयासाठी १२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून, यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, २ मोटार वाहन निरीक्षक, ३ सहायक मोटार वाहन निरीक्षकांचा समावेश आहे. वाहनांचे हस्तांतरण, लायसन्सचे नूतनीकरण, परवाना नूतनीकरण, चॉईस नंबरसाठी अर्ज प्रक्रिया आदी कामकाज सुरू झाले आहे. शिकाऊ परवाना, पर्मनंट लायसन्स, नवीन वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्राचे कामकाज या ठिकाणी सध्या होणार नसल्याचे सांगण्यात आले.