छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर प्रत्यक्ष दरोडा घालणाऱ्या ५ जणांच्या पोलीस कोठडीची १४ दिवसांची मुदत संपल्याने मंगळवारी (१० जून) त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. अद्याप सोने सापडले नसताना दरोडा घालणारेच आता पोलिसांच्या ताब्यात राहणार नसल्याने सोने मिळणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजवर साडेपाच किलोपैकी अवघे ६० तोळे सोने आणि ३० किलो चांदीच जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित सोन्याचा सुगावा पोलिसांना लागला असून, त्याबाबत सबळ पुरावे नसल्याने सध्या वाच्यता केली जात नसल्याचे आज, ११ जूनच्या अंकात एका प्रसिद्ध दैनिकाने म्हटले आहे. तूर्त सोन्याचे गूढ कायम राहिले आहे.
दरोड्यातील एकूण १७ आरोपी हर्सूल कारागृहात गेले आहेत. भविष्यात ते पुन्हा पोलिसांच्या ताब्यात येतील, ही शक्यता धुसरच आहे. दरोडेखोर सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (वय ४५, रा. अंबाजोगाई) याचा मित्र सूर्यकांत श्रीराम मुळे (रा. अंबाजोगाई) हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने सोने विकून पुण्याच्या एका डीलरकडून ६.५ लाखांत घेतलेली मारुती ब्रीझा कार मंगळवारी जप्त करण्यात आली. त्याच्या आणखी एका अवसेकर नावाच्या मित्राला पुण्यातून शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दरोड्यानंतर तिरुपती दर्शनासाठी गेलेल्या गंगणे, अमोल व इतरांसोबत अवसेकरही होता. रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी केली जात होती. दरोड्याचा सूत्रधार अमोल बाबूराव खोतकर (वय ३४, रा. पडेगाव) याच्या एन्काऊंटरचा सध्या सीआयडीकडून तपास केला जात आहे.
दरोड्याची पार्श्वभूमी…
उद्योजक संतोष लड्डा यांची वाळूज औद्योगिक वसाहतीत दिशा ऑटो कॉम्प्स कंपनी आहे. या कंपनीतून समुद्रात ऑइल व गॅसच्या पाइपलाइनसाठी पार्ट निर्यात केले जातात. लड्डा हे मूळचे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळचे आहेत. त्यांचा मुलगा क्षितीजने अमेरिकेत इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग विषयात एमएस केले असून, त्याच्या पदवीप्रदान सोहळ्यात सहभागासाठी ७ मे रोजी संतोष लड्डा हे पत्नी, मोठ्या मुलासह अमेरिकेत गेले होते. लड्डा यांनी अमेरिकेला कुटुंबासह जाताना १९ वर्षांपासून चालक असलेले संजय झळके यांना घराची देखभाल करण्यास सांगितले होते. सहा शस्त्रधारी दरोडेखोरांनी १५ मे रोजी पहाटे दोन ते चारच्या दरम्यान दरोडा घातला होता. झळके यांना मारहाण करून त्याचे हात बांधून गावठी पिस्तूलचा धाक दाखवून दरोडेखोरांनी एकूण ३ कोटी ४६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल नेला होता. लड्डा यांचा बालमित्र बालासाहेब चंद्रकांत इंगोले (४६) यानेच या दरोड्याचे प्लॅनिंग केले होते. मात्र नंतर त्याला बाजूला ठेवून अमोल खोतकर आणि योगेश हाजबेने याने नवे साथीदार जमवून दरोडा घातला होता.
आजपर्यंत अटक केलेले आरोपी…
(प्रत्यक्ष दरोडा घालणारे)
१.योगेश सुभाष हाजबे (वय ३१, रा. वडगाव कोल्हाटी)
२.सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन (वय ३७, रा. रांजणगाव शेणपुंजी)
३.महेंद्र माधव बिडवे (वय ३८, रा. साजापूर)
४.सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे (वय ४५, रा. अंबाजोगाई)
५.सोहेल जलील शेख (वय २२, रा. अंबाजोगाई)
सूत्रधाराचा एन्काऊंटर : अमोल बाबूराव खोतकर (वय ३४, रा. पडेगाव)
धागेदोरे लागून आरोपी बनलेले…
६.देविदास नाना शिंदे (वय ४५, रा. शिवाजीनगर, वडगाव कोल्हाटी)
७.बाळासाहेब चंद्रकांत इंगोले (वय ४६, रा. सूर्यवंशीनगर, वाळूज महानगर)
८.महेश दादाराव गोराडे (वय २६, रा. वडगाव कोल्हाटी)
९.गणेश गंगाधर गोराडे (वय २२, रा. सिडको वाळूज महानगर),
१०.आजिनाथ पुंजाराम जाधव (वय २२, दोघे रा. सिडको वाळूज महानगर)
११.बबिता सुरेश गंगणे (रा. कुत्तर विहीर, अंबाजोगाई, जि. बीड, दरोडेखोर गंगणेची पत्नी)
१२.भारत नरहरी कांबळे (रा. मोटेगाव, ता. रेणापूर, जि. लातूर, दरोडेखोर गंगणेचा सासरा)
१३.सोने शेख सोहेल शेख मुस्तफा (वय २६, रा. अंबेजोगाई)
१४.शेख अबुजर ऊर्फ शाहीद (वय २३, रा. अंबेजोगाई)
१५.शेख शाहरूख शेख रफिक (वय ३२, रा. नांदेड)
१६. सराफा आशिष जयकुमार बाकलीवाल (वय ४२, रा. वजीराबाद, नांदेड)
१७. सूर्यकांत श्रीराम मुळे (रा. अंबाजोगाई)