गंगापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : पत्नीच्या २८ वर्षीय प्रियकरावर गावठी कट्ट्यातून ३ गोळ्या झाडणारा कुख्यात गुन्हेगार महेश काशीनाथ काळे (वय ३०, रा. जामगाव) याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने समृध्दी महामार्गालगतच्या कोलठाणवाडी शिवारातील डोंगरावर अटक केली. तो या ठिकाणी लपून बसला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याच्यावर झडप घालत मुसक्या आवळल्या. ही कारवाई सोमवारी (९ जून) करण्यात आली.
गंगापूर शहराजवळील छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाजे अमृततुल्य चहाच्या हॉटेलमध्ये ५ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास महेशने आदिनाथ दिलीप जाधव (वय २८, जामगाव ता. गंगापूर) याच्यावर गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी आदिनाथच्या पोटात गेली, तर दोन गोळ्या त्याला चाटून गेल्या होत्या. सुदैवाने आदिनाथ वाचला. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महेशच्या शोधासाठी तीन पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेनेही या घटनेचा समांतर तपास करत महेशचा शोध सुरू केला होता. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश वाघ, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे व त्यांचे पथक ५ मेपासून महेशच्या मागावर होते. याचदरम्यान गुप्त बातमीदाराकडून त्यांना माहिती मिळाली, की महेश समृध्दी महामार्गालगतच्या कोलठाणवाडी गावाच्या शिवारात डोंगरावर लपून बसला आहे. पोलिसांनी लगेचच तिथे जाऊन सापळा रचला. महेशला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला तपासकामी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश वाघ, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. मिसळे, सुधीर मोटे, सहायक फौजदार लहु थोटे, पोलीस अंमलदार श्रीमंत भालेराव, वाल्मिक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, बबन डोके, चालक पोलीस अंमलदार नीलेश कुडे, संजय तांदळे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली.
काय आहे प्रकरण…
एकाच गावातील आदिनाथ आणि महेश आधी मित्र होते. मात्र आदिनाथने महेशच्या पत्नीवर वाईट नजर टाकून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. मित्र आदिनाथ आणि आपल्या पत्नीचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे महेशच्या लक्षात आल्याने त्याने आदिनाथला जाब विचारत पत्नीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र आदिनाथ आणि महेशची पत्नी खूप पुढे गेले होते. यातून महेश आणि आदिनाथमध्ये अनेकदा वाद झाला. त्यांची मैत्री संपली. आदिनाथ गुरुवारी दुपारी गंगापूर शहरापासून एक कि.मी. अंतरावर छत्रपती संभाजीनगर मार्गावर वाजे अमृततुल्य हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा घेत होता. त्याचवेळी महेश तिथे आला. त्यानंतर आदिनाथ व महेश यांच्यात वाद झाला. महेशने स्वतःजवळील गावठी कट्ट्यातून आदिनाथवर तीन गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत आदिनाथ स्वतः दुचाकी चालवत गंगापूर पोलीस ठाण्यात आला. महेशने माझ्यावर गोळीबार केल्याचे सांगून त्याने महेशचा कट्टा पोलिसांकडे दिला होता.