छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव, पण वेडीवाकडी येत असलेल्या मोटारसायकलीने पायी निघालेल्या १७ वर्षीय तरुणीला उडवले. यात तरुणी जखमी झाली आहे. ही घटना बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमी ते राजे शिवाजी महाविद्यालयाच्या रोडवर शुक्रवारी (६ जून) सकाळी ११ च्या घडली.
ऋतुजा दीपक डुंबरे (वय १७, रा. तिरंगा कॉलनी पंढरपूर, वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर) या तरुणीने याप्रकरणात तक्रार दिली आहे. तिच्यावर सध्या बजाजनगरच्या घृष्णेश्वर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. ती आई-वडील व बहिणीसह राहते. १२ वीच्या विज्ञान शाखेत एस. बी. कॉलेजमध्ये शिकते. शुक्रवारी (६ जून) सकाळी ११ च्या सुमारास ऋतुजा, तिची आई आणि छोटी बहीण प्राची अशा तिघी अॅडमिशन घेण्यासाठी राजे शिवाजी महाविद्यालयाकडे जात होते. गरुडझेप अकॅडमी ते राजे शिवाजी महाविद्यालय येथे पायी मधल्या रस्त्याने जात असताना मागून एक काळी मोटारसायकल भरधाव आली.
दोघे व्यक्ती वेडीवाकडी चालवत व कट मारत आले व ऋतुजाला मागून उडवले. ऋतुजा दूरवर पडल्याने तिच्या डोक्याला, कपाळावर मार लागल्याने ती बेशुध्द पडली. तिच्या आई व बहिणीने आरडा ओरड केल्याने लोक जमले. लोकांच्या मदतीने ऋतुजाला घृष्णेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथील मुलांच्या मदतीने तिने मोटारसायकल चालकाचा व गाडीचा फोटो घेतला. त्या मोटारसायकलचा नंबर MH 20 CL 8247 असल्याचे समोर आले. ऋतुजाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या मोटारसायकलील दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुरेश तारव करत आहेत.