छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एकाच्या आईच्या पोटी जन्म घेतलेले बहीण भाऊ लहानपणी एकमेकांना घासातला घास भरवत असतील… पण आता मोठे झाल्यावर जमिनीच्या अवघ्या ६०० स्क्वेअर फूटच्या तुकड्यासाठी एकमेकांच्या जिवावर उठायला कमी करत नाहीत. रविवारी (८ जून) सायंकाळी बहीण तिच्या नवऱ्याला घेऊन आणि तो त्याच्या बायकोला घेऊन एकमेकांना तुटून पडले. यात भाऊ जखमी झाला आहे. ही घटना वसंतनगर जाधववाडी येथे घडली.
गजानन विनोद वाघमोडे (वय ३४, रा. वसंतनगर जाधववाडी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नी, दोन मुलांसह राहतात. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. प्लॉट नं. ४० सर्वे नं. १५४ वसंतनगर जाधववाडी येथे त्यांच्या आईच्या नावावर ६०० स्क्वेअर फुटांचे घर असून या घराबाबत गजानन व त्यांची बहीण स्वाती व्यकटेंश यडले (वय ३१) यांच्यात न्यायालयात वाद चालू आहे. रविवारी (८ जून) सायंकाळी सहाला स्वाती यडले व तिचा पती व्यंकटेश माधवराव यडले (वय ३२, रा. हरियाणा) हे वाटणीवरून वाद चालू असलेल्या घरी आले. साफसफाई करत असताना गजानन यांनी पाहिले. ते व त्यांची पत्नी कोमल गजानन वाघमोडे यांनी स्वाती व तिच्या पतीला घराबाबत वाद चालू असताना तुम्ही घर का उघडले, असे विचारले.
त्यावर बहीण स्वाती म्हणाली, की घर माझ्या नावावर आहे. तुम्हाला काय करायचे? तेव्हा कोमल या स्वातीला समजावून सांगत होत्या. त्याचवेळी दोघांनी कोमल यांना हाताचापटांनी मारहाण केली व शिविगाळ करत असताना गजानन मध्ये पडले असता व्यंकटेश याने तुला काय करायचे, घर आमचे आहे, असे म्हणून त्याच्या हातातील लोखंडी गज गजानन यांच्या डोक्यात उजव्या बाजूला मारून जखमी केले. दोघांनी हाताचापटांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. परत घराबाबत विचारले तर तुला व तुझ्या पत्नीला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर गजानन व त्यांच्या पत्नीने हर्सूल पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. सोमवारी (९ जून) या प्रकरणात हर्सूल पोलिसांनी स्वाती व व्यंकटेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार केशव काकडे करत आहेत.