छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सासऱ्याला मोठ्या जावयाने धक्का देऊन दुसऱ्या खोलीत ढकलले. त्यामुळे सासऱ्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जातो, असे म्हणून त्यानेच कारमधून सासऱ्याला नेले. मात्र हॉस्पिटलमध्ये भरती न करता तसेच गाडीत ठेवले. जेणेकरून त्यांचा मृत्यू व्हावा. सासऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रकरण दडपले जाईल, असे मोठ्या जावयाला वाटले. लहान जावई व लेकीने एमजीएम हॉस्पिटलला जेव्हा पत्र पाठवून काय उपचार केले, हे विचारले तेव्हा एमजीएमने असा कोणता रुग्ण आमच्याकडे दाखल झालाच नाही, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे, हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर लगेचच सासू, पत्नी, शेजारील व्यक्ती एमजीएम हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांना कॅज्युल्टी विभागासमोर हा मोठा जावई व त्याचा चालक दिसलेही. कॅज्युल्टी विभागात उपचार सुरू असल्याचे खोटेच सांगत मोठ्या जावयाने सर्वांना घरी परत पाठवले आणि पहाटे थेट मृतदेहच घेऊन घरी आला होता…. सिडको एन ५ मधील गुलमोहर कॉलनीतील या हायप्रोफाइल घटनेने छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या मोठ्या जावयाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ नुसार सोमवारी (९ जून) गुन्हा दाखल केला आहे.
डॉली सुनिलकुमार चोप्रा (वय ६२, रा. गुलमोहर कॉलनी, एन ५, सिडको) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे पती सुनिल चोप्रा व्हिडीओकॉन कंपनीत काम करत होते. ते ८ वर्षांपूर्वी कंपनीतून रिटायर्ड झाले आहेत. सध्या घरीच असतात. त्यांना दोन मुली स्वाती व कनूप्रिया चोप्रा असून दोघींचे लग्न झाले आहे. स्वाती तिचे पती अखिलेश मुदीराज यांच्यासोबत नंदवन कॉलनी याठिकाणी राहते, दुसरी मुलगी नामे कनुप्रिया तिचे पती अमनप्रित सिंग यांच्यासोबत हैदराबादेत राहते. मोठी मुलगी स्वातीला लग्नापासूनच तिचा पती अखिलेश सतत त्रास देत असल्याने ती मुलांसह नेहमी माहेरी येत जात असे व तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगायची. छोटी मुलगी कनुप्रिया ही सुमारे साडेतीन वर्षांपासून छ. संभाजीनगर येथे आली नाही. मात्र ते नांदेड व मुंबई याठिकाणी भेटले होते.
२८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ला लोकमत भवन याठिकाणी मुलाचा समर क्लब असल्याने मुलगी स्वाती शिकवण्यासाठी येणार होती. त्यावेळी ती आई डॉली यांच्याकडे आली. दोन्ही मुलांना आईकडे सोडून समर क्लबसाठी निघून गेली. त्यानंतर ३० एप्रिल २०२५ अचानक त्यांचा जावई अखिलेश घरी आला. स्वातीला काहीएक न सांगता मुलगा विवान ( वय ६ वर्षे, व मुलगी त्रिशिका (वय ३ वर्षे) यांना त्यांच्यासोबत घेऊन गेला. त्यानंतर स्वातीने आईसमोरच अखिलेशला फोन केला व सांगितले की, माझी मुले परत आणून सोड. नाहीतर मी तुझ्यावर केस करेल. असे बोलल्यानंतर १ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ ला अखिलेश हा त्याच्या गाडीमधून मुलांसोबत डॉली यांच्याकडे आला. स्वातीला गोड बोलून जेवणाकरता जायचे आहे, असे सांगून घेऊन गेला. त्यानंतर रात्री साडेनऊच्या अखिलेश, स्वाती, दोन मुले जेवण करून घरी आले. त्यावेळी डॉली आणि त्यांचे पती सुनिलकुमार घरात बसून होते. घरी आल्यानंतर अखिलेश व स्वाती थोडा वेळ शांत बसले. मात्र त्यानंतर त्यांच्यात जोरात भांडणे सुरू झाली.
सासू-सासरे भांडण मिटवत असताना मोठ्या जावयाचा पारा वाढतच गेला…
डॉली व त्यांच्या पतीने भांडणे सोडवण्याचा व त्या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. भांडणे करू नका. शांत राहा. तुमच्या लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. तुम्हाला दोन मुले आहेत, असे सासरा समजावून सांगत असताना अखिलेश सुनिलकुमार यांना म्हणाला, तू कोण आहे मला सांगणारा, तू जा आत आणि सुनिलकुमार यांना धक्का दिला. त्यावेळी सुनिलकुमार खाली पडले. त्यावेळी डॉली यांनी त्यांना उचलून आतमधील रूममध्ये नेले. अखिलेश बाहेरून मोठमोठ्याने सुनिलकुमार यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता. अखिलेश ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने डॉली यांनी लहान जावई अमनप्रित यांना कॉल केला. मात्र त्यांनी उचलला नाही. त्यावेळी अखिलेश म्हणाला, की तो कोण आहे माझ्या फॅमिलीमध्ये मध्ये- मध्ये करणारा व अखिलेशनेच अमनप्रित यांना कॉल लावला व म्हणाला, की तू हमारे फॅमिली मॅटर में इंटरफेअर मत कर. अगर तू इंटरफेअर करेगा तो तेरे को भी देख लेता हूँ, असे म्हणून अखिलेश याने फोन ठेवून दिला.
छोट्या मुलीला कॉल करून पिता म्हणाला, अखिलेशने मला धक्का देऊन पाडले, मी वाचणार नाही…
सुनिलकुमार यांनी छोटी मुलगी नामे कनूप्रिया हिला फोन केला व बोलू लागले की, मेरी तब्येत खराब हो रही है, अखिलेश आज किसी की भी नही सून रहा है, मुझे भी जोर से धक्का मारके गिराया है, तू डॉक्टर को बुला ले, मैं बचूंगा की नही मेरे को नही पता, तू अखिलेश की पोलीस कंपलेंट करना, असे बोलत असतानाच सुनिलकुमार हे बेडवर पडले. त्यानंतर डॉली यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उठत नव्हते. त्यावेळी डॉली यांनी स्वातीला बोलावले. दोघींनी उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उठत नव्हते. स्वातीने अखिलेश यास हाक मारली. अखिलेश व त्याचा ड्रायव्हर आतमध्ये आले. त्यांनीदेखील सुनिलकुमार यांच्या तोंडावर पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उठत नव्हते. त्यानंतर अखिलेश, त्याचा ड्रायव्हर मनोज, शेजारचे जोशी यांनी सुनिलकुमार यांना गाडीत टाकून अखिलेश व त्याचा ड्रायव्हर त्यांना घेऊन एमजीएम हॉस्पिटलला घेऊन गेले.
अखिलेश खोटेच म्हणाला, कॅजूल्टी विभागात उपचार सुरू आहेत…
मुलगी कनुप्रिया हिचा फोन आला व सांगितले की, अखिलेशच्या विश्वासावर पप्पांना का पाठवले आहे, त्याच्यामुळेच हे सर्व झाले आहे. तूदेखील तात्काळ हॉस्पीटल जा, असे म्हटल्याने डॉली या शेजारी राहणारे जोशी यांना घेऊन स्वाती, दोन मुलांसह एमजीएम हॉस्पिटल याठिकाणी असणाऱ्या कॅजूल्टी विभागाबाहेर गेल्या. कॅल्जूल्टी विभागाबाहेर अखिलेश व त्याचा ड्रायव्हर मनोज उभे दिसले. त्याठिकाणी जाऊन पती कुठे आहेत, असे विचारले असता, अखिलेश म्हणाला की, त्यांच्यावर कॅजूल्टी विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांना तपासत आहेत. मी इथे थांबून राहतो. तुम्ही लहान मुलांना घेऊन घरी जा. मी काही असेल तर तुम्हाला फोनवर कळवितो असे म्हणून त्याने जोशी यांच्या गाडीतच बसून दिले व घरी पाठवले. त्यानंतर स्वाती यांनी घरी आल्यावर समजून सांगितले की, पप्पांची तब्येत ठिक आहे. काही होणार नाही. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास अखिलेश, स्वाती, अखिलेशचे वडील, अखिलेशची बहीण, मनोज असे सर्वजण सुनिलकुमार यांची बॉडी घेऊन घरात आले व सांगितले की, सुनिलकुमार यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर अखिलेशचे इतर नातेवाइक जमा होण्यास सुरुवात झाली.
पीएम करायला नकार, अखिलेशची आरडाओरड…
सकाळी साडेनऊला कनूप्रिया व तिचे पती अमनप्रित घरी आले. त्यांनी सुनिलकुमार यांच्या बॉडीचे पोस्टमॉर्टम करायचे आहे, असे अखिलेश यास सांगितले. त्यावेळी अखिलेश व त्याच्या नातेवाइकांनी पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला व आरडाओरडा करू लागले. त्यावेळी अमनप्रित यांनी पोलिसाना बोलावले. त्यानंतर सुनिलकुमार यांची बॉडी पोस्टमॉर्टम करण्याकरिता घाटी रुग्णालयात नेण्यात आली. त्याठिकाणीदेखील अखिलेश व त्याचे नातेवाईक आले. त्यांनी अमनप्रित यांना शिवीगाळ केली. अखिलेशदेखील जोराजोरात शिवीगाळ करू लागला. त्यानंतर अंधार पडत असल्याने मध्यरात्री अंत्यसंस्कार करत नसल्याने बॉडी मॉर्चुरी विभागात ठेवली. त्यानंतर २ मे २०२५ रोजी डॉली यांनी स्वातीच्या पतीच्या मोबाईलवर अंत्यसंस्काराकरिता फोन केले. परंतु त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे सकाळी साडेआठच्या सुमारास डॉली, मुलगी कनूप्रिया, जावई अमनप्रित यांनी मिळून उस्मानपुरा स्मशानभूमीत जाऊन अंत्यस्कार केले.
एमजीएम म्हणाले, असा कोणता रुग्ण आमच्याकडे आणलाच नाही…
कनुप्रिया ही डॉक्टर असल्याने तिने पप्पाचा मृत्यू नक्की कशामुळे झाला व त्यांच्यावर एमजीएम हॉस्पिटलमध्ये कोणते कोणते उपचार केले, याबाबतचे कागदपत्रे मिळण्याकरिता ४ जून २०२५ राेजी अर्ज दिला. ६ जून २०२५ रोजी एमजीएम हॉस्पिटलचे पत्र प्राप्त झाले. त्यामध्ये लिहीले होते की, १ मे २०२५ रोजी सुनिलकुमार दर्शनलाल चोप्रा या नावाचे कोणतेही पेंशट हॉस्पिटलला ॲडमीट झाले नाही. त्यांच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाही. त्यावेळी डॉली यांना कळले, की जावई अखिलेश याने सुनिलकुमार यांना कोणत्याही हॉस्पिटलला ॲडमीट न करता घरातून गाडीत टाकून तसेच गाडीमध्ये ठेवले व त्यातच सुनिलकुमार पतीचा मृत्यू झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी अखिलेशविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर करत आहेत.