खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : पळसगाव (ता. खुलताबाद) येथे गॅस्ट्रोची साथ पसरली असून, ७० वर रुग्णसंख्या गेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. रुग्णांना जुलाब, उलटी आणि मळमळ आदी त्रास होत आहे.
वेरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह गल्लेबोरगाव, कन्नड, छत्रपती संभाजीनगर येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत ४ ते ५ दिवसांपासून रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अजूनही नवीन रुग्ण दाखल होत आहेत. आरोग्य विभागाने पळसगावात येऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. वेरूळचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्ताफ शेख यांनी आवाहन केले आहे, की ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे. जास्त थंड, तेलकट, फराळाचे साहित्य टाळावे. रुग्णांनी घाबरून जाऊ नये, लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.