छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कटकगेट येथील रहीम अहेमद नजीब अहेमद (वय ४१) आणि छावणी येथील सय्यद अरशद सय्यद अब्दुल रहेमान (वय ६१) हे पवित्र हज यात्रेसाठी गेले होते. या दोन्ही भाविकांचा तिथेच मृत्यू झाल्याची बातमी शहरात आल्याने नातेवाइकांत शोककळा पसरली.
रहीम अहेमद हे प्लॉटिंग व्यावसायिक होते. १८ मे रोजी पवित्र हज यात्रेला पत्नीसह गेले होते. रविवारी (८ जून) दिवसभर इबादत केल्यानंतर रात्री मक्का येथील अजिजिया बिल्डिंग क्रमांक ४ येथे पोहोचले असता त्या ठिकाणीच त्यांचे अचानक निधन झाले. त्यांची नमाज-ए-जनाजा मक्का येथे अदा करण्यात आली. तिथेच दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले आहेत. सय्यद अरशद हे निवृत्त एनसीसी अधिकारी होते. ते लहान भाऊ एटीएसचे फौजदार सय्यद आरेफ यांच्यासोबत हजला गेले होते. रविवारीच मगरीबच्या नमाजनंतर मक्का शरीफ येथे काबाची परिक्रमा करत होते. याचदरम्यान अचानक त्यांचे निधन झाले. सकाळी फजरच्या नमाजनंतर त्यांची हरम शरीफ येथे नमाज-ए-जनाजा अदा करण्यात आली. तेथेच दफनविधी करण्यात आला.