छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आज, १० जूनला वटपौर्णिमा… पत्नी वडाला सातफेरे मारून आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करताना दिसत आहे… मात्र काही बायका अशाही असतात ज्यांच्यामुळे पती जीवंतपणीच नरकयातना भोगत असतो… अशा वाईट प्रवृत्तीविरुद्ध वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी (९ जून) सकाळी १० ला पत्नीपीडितांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. पिंपळ वृक्षाचे पूजन करत पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि एकतर्फी व्यवस्थेविरोधात आक्रोश केला. वाळूज एमआयडीसी परिसरातील करोडी येथे पत्नीपीडित पुरुष आश्रम आहे.
आश्रमाचे संस्थापक अॅड. भारत फुलारे यांनी पत्रकारांशी बोलताना पिंपळ पौर्णिमा साजरी करण्याबद्दल सांगितले. ते म्हणाले, की स्त्रिया वटसावित्री दिवशी वटवृक्षाची पूजा करतात. सात जन्मांसाठी एकच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. पण आज अनेक पुरुष या जन्मी पत्नीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. महिला सबलीकरणाच्या नावाखाली बनवलेले अनेक कायदे आता हत्यार बनून पुरुषांवर चालवले जात आहेत. लग्न झाल्यावर अनेक महिलांचा पतीबद्दलचा दृष्टिकोन बदलतो आणि मग सुरू होते खोट्या तक्रारींची मालिका, गंभीर गुन्ह्यांच्या स्वरुपात. पतीसोबतच संपूर्ण कुटुंबही यात गोवले जाते. यात खरं खोटं कोणतं हे विचारण्याआधीच पुरुषांना दोषी ठरवण्याची एक मानसिकता समाजात रुजलेली आहे.

महिला व पुरुष असा भेद भाव न करता दोघांना देखील समान न्याय मिळायला हवा. २०२३ मध्ये १ लाख २० हजार विवाहित पुरुषांनी आत्महत्या केली आहे, जी महिला आत्महत्येच्या संख्येपेक्षा तब्बल ३ पट अधिक होती. सुप्रीम कोर्टाने २०२३ मध्ये ४९८ अ कायद्याचा गैरवापर थांबवण्याचे निर्देश दिले तरी स्थानिक पोलीस यंत्रणा अजूनही महिलांच्या एकतर्फी आरोपांवर पुरुषांना अटक करत आहे. पोटगी प्रकरणांमध्ये अनेक पुरुष स्वतःचे घर, नोकरी, प्रतिष्ठा गमावत आहेत. एकदा पोटगी ठरली की पुरुष जन्मभर आर्थिक शोषणाला सामोरे जातो, असे ते म्हणाले. पत्नीपीडित पुरुष आश्रमात गेल्या पाच वर्षांपासून पिंपळ पौर्णिमा साजरी करून समाज व शासनाचे लक्ष पुरुषांच्या समस्या आणि अन्यायाकडे वेधत आहे, असेही ॲड. फुलारे यांनी सांगितले. “देव तरी आमचे म्हणणे ऐकेल,” या भावनेने पिंपळ वृक्षासमोर साकडे घालून पुरुषांच्या अश्रूंना आवाज देण्यात आला, असे ते म्हणाले.

पुरुष हक्कांसाठी केलेल्या मागण्या…
पुरुष आयोगाची तातडीने स्थापना करावी, खोट्या तक्रारींविरोधात लिंग निरपेक्ष कायदेशीर कारवाई व शिक्षा व्हावी. प्रत्येक जिल्ह्यात पुरुष तक्रार निवारण केंद्र सुरू करावे. पोलीस ठाण्यांत पुरुष दक्षता कक्ष तयार करावा. कौटुंबिक वादांचे प्रकरण एक वर्षात निकाली काढण्याचे बंधन असावे. या अनोख्या पिंपळ पौर्णिमा कार्यक्रमाला उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, प्रवीण कांबळे, श्रीराम तांगडे, संजय भांड,वैभव घोळवे, दिनेश भाऊ दुधाट, उमेश दुधाट,आणि इतर अनेक कार्यकर्ते व पीडित पुरुष उपस्थित होते.