छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दुचाकीवरून येत मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या ३ अल्पवयीनांच्या कृत्याचा पर्दाफाश जवाहरनगर ठाण्याच्या बीट मार्शल पोलिसांनी केला आहे. त्याचवेळी सिडको पोलिसांनी २६ वर्षीय दुकानफोड्याला जेरबंद केले. मोबाइल चोरीची घटना आकाशवाणी चौकात घडली होती. तिघा अल्पवयीन संशयितांकडून ४ मोबाइल आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे, तर दुकानफोड्याची रिक्षा जप्त करण्यात आली.
बहीण पुण्यावरून येत असल्याने थांबले होते आकाशवाणी चौकात…
बाबासाहेब विनायक डिडोरे (वय ५४, रा. भानुदासनगर, महादेव मंदिराजवळ) हे १६ मे रोजी पहाटे साडेतीनला त्यांची बहीण पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला येत असल्याने त्यांना घेण्यासाठी आकाशवाणी चौकात पान टपरीजवळ थांबलेले होते. त्रिमूर्ती चौकाकडून आकाशवाणी चौकाकडे येऊन ३ मुलांनी मोटासायकलीवरून येत डिडोरे यांच्या हातातील मोबाइल (किंमत १८ हजार ४९९ रुपये) हिसकावून पळ काढला होता. दुचाकीमागे भगव्या रंगात आरोही मराठीत लिहिलेले होते. ते मोंढानाका दिशेने जालना रोडने पळून गेले होते. डिडोरे यांनी पाठलाग केला असता मोंढानाका उड्डाणपुलाखालून जाफर गेटच्या दिशेने भरधाव पळून गेले. या घटनेची तक्रार ८ जूनला डिडोरे यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात केली. त्यांच्या काकूचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने त्यांनी या घटनेची तक्रार उशिरा केली. गुन्हा दाखल होताच बिट मार्शलचे पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्हीचे फूटेज तपासले.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित मुले सिडको एन ६ येथे असल्याचे कळताच तिथे जाऊन दोन मुलांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून डिडोरे यांच्या मोबाइलसह आणखी ३ मोबाइल जप्त करण्यात आले. दोन्ही मुलांचे वय १७ असल्याचे समोर आले. त्यांचा तिसरा साथीदारही अल्पवयीन असून, तो कन्नडचा असल्याचे चौकशीतून समोर आले. चोरीसाठी त्यांनी वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकलही (MH 20 HD 7060) जप्त करण्यात आली. ४ मोबाइल व मोटारसायकल असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी साहेब, सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार सहायक फौजदार रमेश जाधव, डायल-११२ चे पोलीस अंमलदार वामन नागरे, बिट मार्शलचे पोलीस अंमलदार मारोती गोरे, मोफतलाल राठोड, विजय सुरे यांनी ही कारवाई केली.
निसार निघाला कुख्यात गुन्हेगार…
विशाल विजयकुमार खंडेलवाल (वय ३४, रा. एन ८ सिडको शिवदत्त हौसिंग सोसायटी छत्रपती संभाजीनगर) यांची युनियन बँकेसमोर एन ८ सिडको येथे श्रीराम सुपर शॉपी आहे. २९ मे रोजी रात्रीतून चोरट्याने शॉपी फोडून ३ हजार रुपयांचे सॅगसंग कंपनीचे इअरपॉड्स, ४० हजार रुपये रोख असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. खंडेलवाल यांनी सिडको पोलीस ठाण्यात ३१ मे रोजी तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांच्या पथकाने चोरट्याचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फूटेजमध्ये चोर रिक्षातून आल्याचे दिसले. तपासात हा प्रकार कुख्यात गुन्हेगार निसार अहमद गफ्फार पठाण ऊर्फ दुल्हन (वय २६, रा. संजयनगर, बायजीपुरा) याने केल्याचे समोर आले. त्यामुळे त्याचा शोध सुरू करण्यात आला. शनिवारी तो चिश्तिया चौकात रिक्षासह उभा असल्याचे कळताच देवकते, सहायक फौजदार सुभाष शेवाळे, अंमलदार मंगेश पवार, प्रदीप दंडवते यांनी त्याठिकाणी जात त्याच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याची रिक्षा जप्त केली. निसारविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून, मोबाइल चोरीप्रकरणी २ महिन्यांपूर्वीच त्याला अटक झाली होती. नुकताच जामिनावर सुटला होता. पुन्हा पोटभाड्याने रिक्षा घेऊन चालवणे सुरू केले. रिक्षा चालवत असताना रात्री रेकी करून एकट्यानेच दुकान फोडायचा.