छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्याच्या मिनी घाटीतील डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. सिझेरियन करताना आतड्यांना छिद्र पडल्याने मातेचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना सोमवारी (९ जून) समोर आली. दोषी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नातेवाइकांनी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह घाटी रुग्णालयातून पुन्हा मिनी घाटीत आणला आणि तासभर ठिय्या दिला. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लता वेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन डॉक्टरांची चौकशी समिती नेमली असून, समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल. निग्लिजन्स कमिटीकडेही हे प्रकरण जाणार असून, मॅटर्नल डेथ ऑडिटही होईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे यांनी म्हटले आहे. नातेवाइकांच्या आरोप आणि आक्रोशामुळे जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.
प्रियंका किरण गांगवे (२०, रा. विश्रांतीनगर, छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्या मातेचे नाव आहे. तिला २ जूनला प्रसूतीसाठी मिनी घाटीत दाखल केले होते. सिझेरियन प्रसूती झाली व मुलगा झाला. मात्र प्रसूतीनंतर तिची प्रकृती बिघडून पोटफुगीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे ३ जूनला तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घाटीत तिच्यावर उपचार सुरू असतानाच रविवारी (८ जून) तिचा मृत्यू झाला. प्रियांकाचे लग्न १३ महिन्यांपूर्वी झालं होतं. प्रियंकाच्या उत्तरीय तपासणी अहवालात आतड्याला छिद्रं पडल्याने जंतुसंसर्ग होऊन मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नातेवाइकांनी सोमवारी (९ जून) दुपारी २ वाजता तिचा मृतदेह घेऊन मिनी घाटी गाठले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रियांकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून डॉक्टरांना तातडीने निलंबित करून त्यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सुरू केली. नातेवाइक एक तास मिनी घाटी रुग्णालयात ठिय्या देऊन होते. वातावरण तणावग्रस्त बनल्याने सिडको एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रियंकाला न्याय देण्याची मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे यांच्याकडे नातेवाइकांनी केली. प्रियंकाचे वडील संजय तरटे, पती किरण गांगवे, नातेवाईक अनिल बरसावणे, मनोज गांगवे उपस्थित होते. आईची ऊबदेखील मुलाला मिळालेलीनाही. मुलावर सध्या घाटीतील एनआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या मुलाचा सांभाळ करण्यासाठी दोन्ही कुटुंबे एकत्र बसून निर्णय घेणार आहेत, असे मनोज गांगवे म्हणाले.
निग्लिजन्स कमिटीकडे जाणार प्रकरण, ही कमिटी काय असते…
निग्लिजन्स कमिटी (Negligence Committee) ही अशा घटनांची चौकशी करण्यासाठी असते जिथे निष्काळजीपणा संशय असतो. निष्काळजीपणाचे स्वरूप समजून घेणे, संबंधित व्यक्तींची जबाबदारी ठरवणे, भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाय सुचवणे असे काम ही कमिटी करते. एखाद्या रुग्णाच्या मृत्यू किंवा त्रासामागे डॉक्टर किंवा रुग्णालयाचा निष्काळजीपणा असेल, तर निग्लिजन्स कमिटी नेमली जाते. ही कमिटी पुरावे गोळा करते. घटनास्थळाची तपासणी करते. रिपोर्ट तयार करते आणि शिस्तभंगाची शिफारस करते.
मॅटर्नल डेथ ऑडिट म्हणजे?
मॅटर्नल डेथ ऑडिट (Maternal Death Audit) म्हणजे गर्भधारणेदरम्यान, प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर एका ठरावीक कालावधीत आईचा मृत्यू झाल्यास, त्या मृत्यूचे कारण शोधून त्याचा सखोल अभ्यास व विश्लेषण करण्याची प्रक्रिया होय. मातेच्या मृत्यूचे खरे कारण समजून घेणे, टाळता आले असते का हे शोधणे, भविष्यात अशा मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणे, आरोग्य व्यवस्थेतील कमतरता ओळखणे व सुधारणा करणे या ऑडिटदरम्यान केले जाते.