पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पैठण एमआयडीसीतील शालिनी ऑरगॅनिक्स प्रा. लि. कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट झाला. घटनेनंतर पत्रे हवेत उडाले, हवेत धुराचे मोठे लोट निर्माण झाले. कंपनीत यावेळी १५ कामगार हजर होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी (९ जून) सकाळी १०.१५ वाजता घडली.
रिॲक्टरला कमी वीजप्रवाह मिळाल्याने तापमान वाढून स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कामगारांनी वेळीच कंपनीच्या बाहेर पळ काढला होता. पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन पाहणी केली. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता, की परिसरातील कंपनीतील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन वाहनांना पाचारण करण्यात आले होते. कंपनीचे किती नुकसान झाले, याची माहिती समोर आलेली नाही. पैठण एमआयडीसीत २२ च्या आसपास केमिकल कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये बहुतेक कामगार कंत्राटी असून, दिवसाला त्यांच्या हातात ४०० ते ५०० रुपये टेकवले जातात. रोज विविध रसायनांच्या संपर्कात येऊनही त्यांना मास्क, हेल्मेट किंवा हातमोजे अशी गरजेची सुरक्षेची साधने पुरवली जात नाहीत.