छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जय श्रीराम… अशी घोषणा दिल्याने ३ संतप्त धर्मांधांनी ४ हिंदूंवर हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात तरुणीलाही सोडले नाही. यात चौघेही जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संतप्त भावना व्यक्त होत आहे. हल्ला केल्यानंतर तिघेही विकृत पसार झाले असून, वाळूज एमआयडीसी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना बजाजनगरच्या हायटेक कॉलेजसमोरील मैदानावरील मेळ्यात रविवारी (८ जून) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली.
ऋषीकेश मच्छिंद्र खेडेकर (वय २१, रा. स्वामी समर्थ चौक अयोध्यानगर बजाजनगर) या तरुणाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. बजाज ऑटो कंपनीत काम करतो. रविवारी रात्री सव्वा दहाला ऋषिकेश, मित्र यशवंत गजानन लंजे (वय २२, रा. जयभवानी चौक बजाजनगर), प्रीतम भारत जाधव (वय २२, रा. जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर), मोनिका ब्रह्मदास टेंभुर्णे (वय २२, रा. जय भवानी चौक बजाजनगर) हे चारही मित्र-मैत्रीण हायटेक कॉलेजसमोरील मैदानावर मेळा भरल्याने फिरण्यासाठी आले होते. राहट पाळण्यात बसले. पाळणा वर जात असताना खाली असलेल्या दोन- तीन व्यक्तींनी पाळणा वेगाने फिरव, असे पाळणाचालकाला सांगितले. त्यामुळे चौघेही घाबरले व पाळण्याच्या मालकाला ओरडून सांगितले, की पाळणा बंद कर. त्याने पाळणा बंद केला.
त्यानंतर चौघांनी खाली उतरताना जय श्रीराम… अशी घोषणा दिली. त्या ठिकाणी दोन- तीन विशिष्ट धर्माच्या व्यक्तींनी तुम्ही जय श्रीरामचे नारे का देत आहात, असा जाब विचारला. त्यावर ऋषिकेश त्यांना समजावून सांगत असताना त्यांना राग आला व त्यांनी ऋषिकेशला लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यातील एकाने त्याच्या हातातील लोखंडी कड्याने ऋषिकेशच्या डाव्या डोळ्याच्या वर मारल्याने डोके फुटले. यशवंत लंजे, प्रीतम जाधव, मोनिका टेंभुर्णे हे भांडण सोडण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही त्या विशिष्ट धर्माच्या दोन- तीन जणांनी संगनमत करून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुम्ही या मेळ्यातून निघून जा, नाहीतर तुम्हाला पळू पळू मारू, अशी धमकी दिली. पोलिसांनी ३ अनोळखी व्यक्तींविरुद्ध आज, ९ जूनला गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे करत आहेत.