कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत विहिरीत आढळल्याने कन्नड तालुक्यातील चिकलठाण शिवारात रविवारी (८ जून) दुपारी २ वाजता एकच खळबळ उडाली. अविनाश बाबूराव बनकर (रा. बाजारसावंगी, खुलताबाद) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ही आत्महत्या की हत्या की अपघात याचा तपास कन्नड ग्रामीण पोलीस करत आहेत.
चिकलठाण येथील कैलासाबाई विठ्ठलराव वैष्णव यांच्या गट नं. ४२० मधील शेतातील विहिरीत दुर्गंध येत असल्याने काही शेतकऱ्यांनी डोकावून पाहिले असता मृतदेह पाण्यावर तरंगलेला दिसला. तातडीने कन्नड ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस अंमलदार कैलास करवंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढला. मृतदेह पाण्यात पूर्णपणे कुजला होता. हातावर त्रिशूल व हनुमान गोंदलेले होते. पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी चक्रे फिरविली असता तो बाजारसावंगीच्या अविनाश बनकर यांचा असल्याचे समोर आले. ते काही दिवसांपासून बेपत्ता होते. चिकलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायम वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतात. त्यामुळे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दिवसभर पडून होता. त्यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. कन्नड ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.