छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विद्युतप्रवाह उतरलेल्या कूलरला स्पर्श झाल्याने ३८ वर्षीय तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील जय भवानीनगर येथे शनिवारी (७ जून) सायंकाळी सातच्या सुमारास घडला.
संजय कमलनारायण जैस्वाल (वय ३८, मूळ रा. चिंचोली लिंबाजी, ता. कन्नड) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. संजय जैस्वाल व्यवसायानिमित्त शहरात राहत होते. शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घरी आले. रात्री ७ च्या सुमारास मोबाइलवर बोलत गॅलरीत आले. त्यांचा हात गॅलरीत ठेवलेल्या व विद्युत प्रवाह उतरलेल्या कुलरला लागला. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. रविवारी सकाळी घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून दुपारी ३ ला मृतदेह चिंचोली लिंबाजी येथे आणण्याला व अंत्यसंस्कार करण्यात आले.

वैजापूरमध्ये १८ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
वैजापूर तालुक्यातील टुणकी गावातील भूषण विनायक पवार (वय १८) या तरुणाचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (८ जून) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. भूषणला विजेचा धक्का बसताच शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. भूषण आपल्या कुटुंबाचा आधार होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, आजी असा परिवार आहे. शिऊर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार विजय भिल्ल करत आहेत.