छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरवासियांसाठी गोड बातमी आहे. रेफ्रिजरेशन क्षेत्रातील जगप्रसिद्ध आणि निडेक ग्लोबल अप्लायन्स समूहाचा भाग असलेल्या एम्ब्रेको कंपनीने छत्रपती संभाजीनगरातील ऑरिक सिटीच्या शेंद्रा इंडस्ट्रीयल झोनमध्ये तब्बल १ हजार २९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यातून १००० जणांना थेट रोजगार मिळणार आहे. कंपनीकडून या ठिकाणी अत्याधुनिक कॉम्प्रेसर उत्पादन प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एम्ब्रेको कंपनीकडून ५० एकरवर २०२६ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्याची शक्यता आहे. प्रकल्पातून दरवर्षी ६० लाख कॉम्प्रेसर युनिट्सचे उत्पादन केले जाईल. घरगुती, तसेच व्यावसायिक फ्रीजसाठी हे युनिटस् असतील. ऊर्जा कार्यक्षम इन्व्हर्टरचे उत्पादनही घेतले जाणार आहे. एम्ब्रेको कंपनी आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मार्चमध्ये सामंजस्य करार झाला होता. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दीड महिन्यापूर्वी शहरात येऊन शेंद्र्यातील ५० एकरचा भूखंड पाहिला होता. ऑरिक सिटीच्या डीएमआयसीमध्ये टोयटा-किर्लोस्कर मोटार्स, लुब्रिझोल इंडिया प्रा.लि., जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी, एथर एनर्जी, पिरॅमल फार्मास्युटिकल्स आदी कंपन्यांनी यापूर्वी ६४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली असून, एम्बॅकोमुळे जगप्रसिद्ध कंपन्या छत्रपती संभाजीनगरात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचा चांगला संदेश सगळीकडे गेला आहे. एम्बॅकोच्या प्रकल्पामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नव्याने मोठ्या संधी उपलब्ध होतील.