छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गेल्या १७ महिन्यांत ४ हजार ९६७ जन्म नोंदीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर विलंबित जन्म नोंदणी तपासणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने चार जणांची समिती गठित केली आहे. ९ ते १३ जून दरम्यान ही समिती चौकशी करणार आहे.
प्रसूतीनंतर अनेक पालक घाटी रुग्णालयातून घरी निघून जातात. जन्म प्रमाणपत्रासाठी लगेचच अर्ज करण्याची आवश्यकता असते. मात्र पालक तसे करत नाहीत. शालेय प्रवेशासह विविध कारणांसाठी जेव्हा त्यांना जन्म प्रमाणपत्राची गरज पडते, तेव्हा घाटी रुग्णालयात येऊन जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज करतात. त्यामुळे उशिराने जन्म नोंद होते. यात गैरप्रकार होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे सोमय्यांच्या आरोपाला बळकटी मिळते. आता छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, त्यांच्या अधिपत्याखालील जन्म-मृत्यू निबंधक कार्यालयातील नोंदीची, घाटी रुग्णालयातील जन्म-मृत्यू नोंदीची सखोल पडताळणी ४ सदस्यीय समिती करणार आहे.
घाटी रुग्णालयात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान ३ हजार २५७ आणि १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान १ हजार ७१० विलंबित जन्म नोंदणी झाल्याचे किरीट सोमय्यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. सोमय्यांच्या आरोपाबाबत घाटी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुचेता जोशी यांनी सांगितले, की घाटी रुग्णालयात प्रसूती झाली की बाळाचे रेकॉर्ड संबंधित सेक्शनला जाते. पालकांचा अर्ज आल्यानंतर जन्म प्रमाणपत्र दिले जाते. अर्ज केल्यानंतर दोन ते साडेतीन महिन्यांत जन्म प्रमाणपत्र दिले जात असल्याचे त्या म्हणाल्या. घाटीत जन्मणाऱ्या शिशुंनाच हे प्रमाणपत्र दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. घाटी रुग्णालयात रोज ६० ते ७० प्रसुती होतात. रोज २५- ३० जन्म प्रमाणपत्रांचे वितरणहोते.