छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आ. संजय केणेकर यांनी ठाकरे गटाला आव्हान दिले होते, की हिंमत असेल तर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करा, निवेदन द्या… मंत्री शिरसाटांचा आक्रमकपणा लक्षात घेता ठाकरे गटाने, आव्हानाची रिस्क न घेता आंदोलनासाठी सॉफ्ट नेते निवडले. आ. प्रदीप जैस्वाल, आ. विलास भुमरे आणि आ. प्रशांत बंब यांना निवेदन देऊन ‘क्या हुआ तेरा वादा’ असे विचारले.
ठाकरे गटाचे ‘क्या हुआ तेरा वादा’ हे आंदोलन १२ जूनपर्यंत चालणार आहे. ५ जून आ. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यालयावर जाऊन घोषणाबाजी करत ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन देण्यात आले होते. त्यामुळे आ. संजय केणेकर खवळले होते. त्यांनी मी असतो तर भाजप कार्यालयात दानवेंना येऊ दिले नसते. त्यांनी हिंमत असेल तर पालकमंत्री आणि शिंदे गटाच्या कार्यालयासमोर आंदोलन करावे, असे आव्हान दिले होते. त्यावर मंत्री सावे यांनी प्रतिक्रिया देताना पक्षाचे कार्यालय हे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी असल्याने जनतेच्या समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे, असे म्हणत केणेकरांच्या आव्हानातील हवा काढून टाकली होती. दुसरीकडे आ. अंबादास दानवे यांनीही आम्ही त्यांना गद्दार मानत असल्याने त्यांच्याकडे निवेदन देण्याचा प्रश्नच नाही, असा टोला लगावला होता. वास्तवात त्याच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केणेकरांचे आव्हान स्वीकारल्यासारखे दाखवत शिंदे गटाचे आ. प्रदीप जैस्वाल आणि विलास भुमरे यांना निवेदन दिले. मात्र मंत्री शिरसाटांच्या कार्यालयाकडे जाण्याची रिस्क घेतली नाही.
आधी जैस्वालांच्या पाया पडले…
आ. प्रदीप जैस्वाल यांना निवेदन देण्यासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी आले, पण आल्या आल्या आधी १० पैकी ८ पदाधिकाऱ्यांनी जैस्वालांचे पाय धरले. नंतर विचारले, क्या हुआ तेरा वाद, या आंदोलनाचे निवेदन दिले. शनिवारी (७ जून) आ. जैस्वाल यांच्या निराला बाजार येथील निवासस्थानी जाऊन मध्य मतदारसंघातील १० पदाधिकारी आले होते. आंदोलनात शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, आनंद तांदूळवाडीकर, लक्ष्मीनारायण बाखरिया, गोपाळ कुलकर्णी, सुगंधकुमार गडवे, राजेंद्र दानवे, नरेश मगर, सुरेश पवार, विनायक देशमुख, संदेश कवडे, संजय हरणे, सीताराम सुरे, सचिन खैरे, बन्सी जाधव आदींनी सहभाग नोंदविला.

पैठणमध्ये भुमरेंना, गंगापूरमध्ये बंब यांना भेटले…
पैठण शहरातील बसस्थानक चौक ते आ. विलास भुमरे यांच्या कार्यालयापर्यंत उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गोर्डे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाने हलगी वाजवत मोर्चा काढला. मोर्चा आ. भुमरे यांच्या कार्यालयासमोर आला. या वेळी त्यांचेही शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूच्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर उपजिल्हाप्रमुख गोर्डे यांनी आ. भुमरे यांना निवडणुकीतील आश्वासने पूर्ण करण्याच्या मागण्यांचे निवेदन दिले. मोर्चात उद्धवसेनेचे तालुकाप्रमुख मनोज पेरे, प्रल्हाद औटे, राखीताई परदेशी, सोमनाथ जाधव, अरुण काळे, अप्पासाहेब गायकवाड, सुरेश दुबाले, तस्लिमा शेख, ठकूबाई कोथिंबिरे, अजय परळकर, सम्राट वानोळे, कल्याण मगरे, संभाजी अत्रे, विवेक म्हस्के, भगवान चौधरी, दादा मेरड, युनूस शेख आदींची उपस्थिती होती. या वेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गंगापूरमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आ. प्रशांत बंब यांना शनिवारी निवेदन देण्यात आले. या वेळी तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात काय म्हटलंय…
विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कर्जमाफी दिली नाही. सरकारने शेतकरी सन्मान योजना १२ हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. एक रुपयांत पीक विमा ही योजना गुंडाळण्यात आली. राज्यात मागील सहा महिन्यांत एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीत सतत नुकसान होत असते. यामुळे सरकार आणि प्रशासनाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे. केवळ पोकळ आश्वासने आणि घोषणाबाजी करण्याऐवजी तत्काळ योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, राज्यातील जनतेला न्याय द्या, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.