छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : पुरी (ता. गंगापूर) येथील महिलांनी तयार केलेल्या प्लास्टीकच्या घोंगट्या आता तयार झाल्या आहेत. त्या आता आळंदी ते पंढरपूर या वारीच्या मार्गावर विक्रीसाठी उपलब्ध होतील. व्यवसायाच्या निमित्ताने पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांचे पावसापासून रक्षण करण्यासाठी या महिलांनी पांडुरंग सेवेची अनोखी वाट शोधली आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळांच्या माध्यमातून पुरी गावातील महिला बचत गटांमध्ये संघटीत झाल्या. त्यांनी प्लास्टीकपासून घोंगट्या (पावसापासून रक्षण करणारे पारंपारिक प्रावरण) बनविण्याचा आणि त्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला. सन २००७ पासून त्या हा व्यवसाय करीत आहेत. १४ बचतगटांच्या माध्यमातून ५० ते ६० महिला या व्यवसायाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यापैकी एक रागिणी महिला बचत गट. सुनिता वसंत गिरी या गटाच्या अध्यक्ष आहेत.

असा असतो कच्चा माल…
विविध उत्पादनांच्या पॅकींगसाठी प्रिंटेड प्लास्टीक पेपर वापरला जातो. हा पेपर आतून कोटींग असलेला असतो. त्याच्या वरच्या भागात उत्पादनाशी संबंधित माहिती छापलेली असते. त्यातील छपाईत काहीतरी दोष असल्याने कंपन्यांकडून हा कागद रद्दबातल केलेला असतो. हा १५० ते २०० जीएसएम कागद या महिला विकत घेतात. हाच त्यांचा कच्चा माल. हा माल बहुदा मुंबई किंवा गुजरातहून येतो. ५० रुपये किलो या दराने घेतलेल्या एक किलो कच्च्या मालापासून ५ घोंगट्या तयार होतात. त्या किमान ५० ते ६० रुपये प्रति घोंगटी या दराने वारकऱ्यांना विकल्या जातात. वारकऱ्यांना पारंपरिक गोणपाट अथवा घोंगडी (मेंढीच्या लोकरीपासून बनवलेली) पासून बनवलेल्या घोगट्यांऐवजी ही घोंगटा अधिक योग्य वाटते. कारण ही वजनाला हलकी असते. त्यामुळे डोक्यावर घेऊन चालत जाणे सहज शक्य होते. वारकऱ्यांसोबत असलेली थैलीही त्यात सहज सांभाळली जाते. शिवाय पाऊस उघडल्यावर सहज घडी करून थैलीत बाळगता येते. रात्री झोपताना अंथरुणासाठीही वापरता येते.

शिलाई ते सिलींग
आधी या महिला घोंगटा शिलाई मशिनवर शिवत असत. आता त्यांनी सिलिंग मशिन आणली आहे. त्याद्वारे घोंगटीची दोन टोके यंत्रावर चिकटवली जातात. त्यामुळे उत्पादनाचा वेग वाढला आहे. यंदा या महिलांनी ८ टन कागद मागवला आहे. घोंगट्यांसोबत त्या याच कागदाची ताडपत्रीही बनवतात. ही ताडपत्री शेतकरी वर्ग आपल्या शेतीमालाला झाकून ठेवण्यासाठी वापरतात. आतापर्यंत ४ टन कागदाची ताडपत्री यंदा विक्री झाली सुद्धा. आता लवकरच घोंगट्या विक्रीसाठी आळंदीकडे रवाना होतील. काही व्यापारी सुद्धा हा माल विकत घेऊन जातात.
‘माविमं’ची भूमिका
दरवेळी या महिला माविमकडून अर्थसहाय्य घेतात आणि त्याद्वारे कच्चा माल खरेदी करतात. त्यातून घोंगट्या तयार करून दरवर्षी त्या विक्रीसाठी नेतात आणि नफा कमावून त्यातून कर्ज फेड करतात. आतापर्यंत २० लाख रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले आहे. त्याची त्या नियमित फेड करत असतात. दरवर्षी त्यांना ५० टक्के रक्कम नफा म्हणून शिल्लक राहते. वारीच्या कालावधीतच विक्री होत असल्याने चार महिने आधीपासून ते कामाला लागतात. वारीचा महिनाभर विक्री करून आपल्या घरी परततात. पदरी असतो नफा आणि वारकऱ्यांची पर्यायाने पांडुरंगाची सेवा केल्याचे संचित.