छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बोगसगिरी करून नोकरी मिळविणाऱ्या २१ जणांना सार्वजनिक बांधकाम विभागाने घरचा रस्ता दाखवला आहे. त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. लाड-पागे समितीने चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी भरतीसाठी नियम ठरवून दिले आहेत. हे नियम धाब्यावर बसवून या २१ जणांची भरती केली होती. पैसे घेऊन नोकऱ्या दिल्याचा संशय असून, यात ३ कोटींचा घोटाळा प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे.
नोकरीसाठी सरासरी १० ते १५ लाख घेतले असतील, तर सुमारे ३ कोटींचा घोटाळा यात दिसत आहे. आस्थापना विभागातील काहींनी नातेवाइकांनाच फसविल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मराठवाड्यातील प्रत्येक सर्कलपर्यंत असण्याची शक्यता आहे. काही प्रकरणे समोर आल्यानंतर याबाबत चौकशी समिती नेमल्यानंतर ही वस्तुस्थिती समोर आली. लाड-पागे समितीच्या नावाने ही बोगस भरती झाल्याचे समोर येत आहे. नॅशनल हायवेचे सर्कल ऑफीस छत्रपती संभाजीनगरात आहे. आठही जिल्ह्यांचे काम या ठिकाणावरून चालते. आस्थापना क्लार्क अंकुश हिवाळेचा हा कारनामा असल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. त्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता एस. एस. भगत यांनी दिली.
वाल्मीचा उपअभियंता येडे पाटील निलंबित
जल व भूमी व्यवस्थापन संस्थेचे सहायक प्रशासकीय अधिकारी तथा उपअभियंता अजय येडे पाटील याला आर्थिक अनियमितते प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. त्याने संचिकांमध्ये खाडाखोड केल्याचे समोर येत आहे. वाल्मीचे प्रभारी महासंचालक तथा जलसंधारण आयुक्त प्रकाश खपले यांनी शुक्रवारी (६ जून) ही कारवाई केली. चौकशी प्रकरणांतील संचिकांमध्ये खाडाखोड करून टिपण्यांमध्ये छेडछाड केल्याचे आढळल्याने येडे पाटलाला ३० मे रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याने चार जूनला खुलासा सादर केला, मात्र तो असमाधानकारक असल्याने निलंबन करण्यात आले.
दोन तलाठी निलंबित
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मूर्तिजापूरचे तलाठी हरिचंद्र वाघ व धामणगाव (ता. खुलताबाद) चे तलाठी दीपक चौर यांना निलंबित केले आहे. कामात हलगर्जीपणा, वरिष्ठांच्या बैठकीस उपस्थित न राहणे, आदेशाचे पालन न करणे, गौण खनिज दंडात्मक कारवाई व वसुलीबाबत उदासीनता, कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी अरेरावी यामुळे तलाठी वाघला तर तलाठी चौरे याला विनापरवानगी गैरहजर राहिल्याने निलंबित करण्यात आले आहे.